धक्कादायक..! सेलूत दहावीचा हिंदी विषयाचा पेपर फुटला, यशवंत विद्यालयातील प्रकार
सचिन धानकुटे
सेलू : – येथील यशवंत विद्यालयाच्या परिक्षा केंद्रातून आज दहावीचा हिंदी विषयाचा पेपर फोडण्यात आला. आज परिक्षा सुरु होताच अवघ्या काही मिनिटात सदर पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाला चांगलेच गालबोट लागले.
सेलूच्या यशवंत विद्यालयात दहावीच्या परिक्षेचे केंद्र आहे. आज शनिवारी हिंदी विषयाचा पेपर होता. दरम्यान परिक्षा केंद्रात पेपर सुरू होताच अवघ्या काही मिनिटात तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे तो पेपर एखाद्या विद्यार्थ्यांने किंवा केंद्रातीलच एखाद्या शिक्षकाने मोबाईलमध्ये त्याचा फोटो घेऊन व्हायरल करण्यामागे नेमका उद्देश तरी काय.. यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. याविषयी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिक्षण विभाग परिक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात याकरिता काटेकोरपणे कॉपीमुक्त अभियान राबवित आहेत, मात्र दुसरीकडे काही महाभाग हिंदी सारख्या विषयाचा पेपर फोडून आपली बुद्धिमत्ता गहाण ठेवत आहेत. एकंदरीतच या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाला मात्र गालबोट लागल्याचे बोलल्या जात आहे.