Breaking
ब्रेकिंग

वाचनाने माणूस समृद्ध, प्रगल्भ होतो : राहुल कर्डिले : जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन : जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

2 0 8 9 8 8

किशोर कारंजेकर 

वर्धा : पुस्तकांमध्ये अफाट ज्ञान आहे. वाचनामुळे हे ज्ञान मानसाला आत्मसात होत असते. ज्ञानामुळे माणूस समृद्ध, प्रगल्भ होतो. त्यामुळे प्रत्येकाने चांगली पुस्तके सातत्याने वाचली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे वर्धा शाखाध्यक्ष तथा कवी संजय इंगळे तिगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून लेखक, कथाकार बालाजी सुतार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, प्रा.डॉ.राजेंद्र मुंढे, माजी प्राचार्य पद्माकर बाविस्कर, प्रशांत पनवेलकर उपस्थित होते.

दिवाळी निमित्त विविध नामांकित प्रकाशने, वृत्तपत्रांच्यावतीने दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. हे अंक जिल्ह्यातील वाचकांना उपलब्ध व्हावे, यासाठी दरवर्षी अंकांचे प्रदर्शन लावण्यात येते. यावर्षीच्या या प्रदर्शनात राज्यभरातील प्रकाशक व वृत्तपत्रांचे 120 अंक प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. वाचकांना अंक पाहण्यासाठी उपलब्ध असून नोंदणीकृत सभासदांना प्रदर्शनी संपल्यानंतर घरी वाचनासाठी उपलब्ध होणार आहे.

वाचन माणसाला समृध्द तर करतेच शिवाय काय चांगले, काय वाईट याची समजही वाचनातून प्राप्त होत असते. संवेदनशीलता आणि आत्मविश्वास देखील वाचनातून प्राप्त होतो. कोणत्याही व्यक्तीला यशप्राप्तीसाठी पुस्तकांचा फार मोठा फायदा होते. लहान वयापासून लागलेली वाचनाची आवड पुढे त्या त्या व्यक्तीला आपले आयुष्य यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देते, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले.

ग्रंथालयातील स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना यशाचे शिखर गाठण्यासाठी वेगवेगळी पुस्तके वाचने फार आवश्यक आहे. परिक्षेची तयारी करतांना अवांतर वाचन देखील उपयुक्त ठरते. त्यामुळे युवकांनी दिवाळी अंक देखील वाचले पाहिजे. आयुष्यात पुढे जातांना युवकांनी आपला प्लॅन बी देखील ठेवला पाहिजे. केवळ अभ्यासच महत्वाचा नाही तर त्यासाठी कठीण परिश्रम आणि सातत्य महत्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करतांनाचे आपले काही अनुभव देखील यावेळी सांगितले.

यावेळी संजय इंगळे तिगावकर, बालाजी सुतार, प्रा.डॉ.राजेंद्र मुंढे यांची देखील भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांनी केले. संचलन जिल्हा ग्रंथालय संघाचे सुधीर गवळी यांनी केले. कार्यक्रमाला वाचक, स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि.24 नोव्हेंबर पर्यंत असून वाचकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे