जैन हिल्सच्या माळरानावर नटलयं हिरवगार “नक्षत्र वन” ; वनस्पती औषधीचं नव्हे तर आध्यात्मिक अन् दुर्मिळ वृक्षांचे बहारदार उद्यान..!
सचिन धानकुटे
वर्धा : – खान्देशातील जळगांव येथे जैन हिल्सच्या विस्तीर्ण अशा परिसरात जगप्रसिद्ध “भाऊंची सृष्टी” आहे. येथील विस्तीर्ण अशा माळरानावर बहारदार आणि हिरव्यागार “नक्षत्र वना”ची निर्मिती करण्यात आली. यामध्ये केवळं वनस्पती औषधीचं नव्हे तर विविध प्रकारच्या आणि प्रजातींचे ५३ डेरेदार आणि बहारदार वृक्षं आहेत.
जळगांवच्या जैन हिल्सच्या परिसरातील भाऊंच्या वाटिकेत सन २०१६ मध्ये संस्थापक भंवरलाल हिरालाल जैन यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त एका वाटिकेचे भावार्पण करण्यात आले. ती वाटिका “नक्षत्र वन” नावाने ओळखली जात असून येथे सप्तर्षी वन तसेच नवग्रह वनाची संकल्पना साकारण्यात आलीयं. या नक्षत्र वनात आध्यात्मिक अन् दुर्मिळ अशा विविध प्रकारच्या आणि प्रजातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यात केवळ वनस्पती औषधीचं नव्हे तर पूजनीय, पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या वृक्षांचे हे हिरवगारं आणि बहारदार असं उद्यान आहे. आध्यात्मिक आणि दुर्मिळ अशा झाडांची योग्यता आणि महत्त्वानुसार येथे क्रमाक्रमाने लावण्यात आलेल्या ५३ वृक्षांमध्ये गोरख चिंच, अंकोल, बहावा, बेहडा, बिब्वा/भिलावा, बीजा, बुद्धास नारळ, चंदन, चारोळी, चुक्रासिया, धूप, सितारंजन(फिदालवूड), हिरवा चाफा, कदंब, कडू कवठ, कहांडोळ, काकड, कापूर, करंबेल, कवडल, कुंकू/कमळ/शेंदरी, कुसूम/लिंबकोष, लोध, नांद्रुक/पिंपरणी, नर्क्या, पारजांभूळ, फाशी/दांडोशी, पुत्रंजीवा/पुत्रवती, रानफणस, रतनगुंज, रोहितक, रुद्राक्ष, रुद्राक्ष-नेपाळ, समुद्र फळ, शिवण/गंभारी, सोनचाफा, सुरंगी, ताम्हण, उद, वेत, बावळा, भवरसाल, पाच पानांचे बेल, गुग्गुळ, काळ उंबर, कांचन पांढरा, कांचन गुलाबी, कांचन पिवळा, लक्ष्मण फळ, मुचकुंद, पान कापूर, रुद्राक्ष चंद्रमुखी आणि रक्तचंदन आदि वृक्षांचा समावेश आहे. भाऊंच्या वाटिके अंतर्गत येणारे हे पाचवे गोलाकार वृक्ष चक्र आहे. ओसाड माळरानावर नटलेल्या नक्षत्र वनातील ह्या आध्यात्मिक अन् दुर्मिळ अशा वृक्षांच्या वनराईत “भाऊं”चे एक मोजँक पोट्रेट देखील आहे. प्रतिक भोसले यांनी २८ हजार पाईप्सच्या तुकड्यांपासून साकारलेले येथील भाऊंचे मोजँक पोट्रेट येणाऱ्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते.