६८ वर्षीय धूरकऱ्याची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा..! “बजरंग शेरू”ने वेधले सगळ्यांचेच लक्ष
सचिन धानकुटे
सेलू : – शहरात कालपासून जंगी शंकरपटाचा थरार चांगलाच रंगला आहे. यावेळी “बजरंग-शेरू” नामक बैलजोडी प्रारंभीच उद्घाटन प्रसंगी धावली अन् “त्या” बैलजोडीच्या ६८ वर्षीय चिरतरुण धूरकऱ्याची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा रंगली.
साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने शहरात भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. काल पहिल्या दिवशी शंकरपटाचे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. सेलू पंचायत समितीचे माजी उपसभापती मारोतराव बेले या शंकरपट आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. यावेळी उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर ट्रायल म्हणून पुरुषोत्तमराव तळवेकर यांची “बजरंग-शेरू” नामक बैलजोडी धावण्यासाठी सज्ज झाली. या बैलजोडीच्या धूरकऱ्याची जबाबदारी कान्हापूर येथील मारोतराव बेले यांच्या खांद्यावर देण्यात आली. शंकरपटाचे ते आधीपासूनच शौकीन असल्याने त्यांनी हसतखेळत ती स्विकारली देखील..! परंतु त्यांचे वयोमान लक्षात घेता साहजिकच अनेकांच्या मनात याविषयी साशंकता होती.
यावेळी झेंडी पडली आणि “बजरंग-शेरु”नामक जोडी अशी काही सूसाट निघाली, तीने अवघ्या ३७ सेकंदात १३५० फुटांचा टप्पा पार केला. याप्रसंगी उपस्थित तरुणाईच्या मनात अक्षरशः धडकी भरली होती. अनेकांनी तर चक्क आश्चर्याने तोंडात बोटं टाकली. या बैलजोडीचे धूरकरी होते शंकरपट आयोजन समितीचे अध्यक्ष ६८ वर्षीय मारोतराव बेले. त्यांच्या ह्याच धाडसाची आणि छंदाची आज अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.