ओबीसी लाभार्थ्यांना उद्योग, व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज : पात्र लाभार्थ्यांसाठी कर्जाच्या सहा योजना : काही कर्ज योजनांवर व्याज परताव्याचा लाभ : महिलांसाठी स्वयंसिध्दा व्याज परतावा योजना

किशोर कारंजेकर
वर्धा : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये ओबीसी लाभार्थ्यांना उद्योग, व्यवसाय स्थापन करता यावा यासाठी 1 लाखापासून 10 लाखापर्यंतच्या कर्ज योजनांचा समावेश आहे. केवळ महिलांसाठी स्वयंसिध्दा व्याज परतावा योजना राबविली जाते. या योजनेवर 12 टक्के दराने व्याज परतावा केला जातो. या योजना ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी मोलाचा हातभार लावत आहे.
महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असेल्या योजनांमध्ये 20 टक्के बीज भांडवल योजना ही एक महत्वाची योजना आहे. ही योजना राष्ट्रीयकृत बॅंकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. योजनेतून 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्यात महामंडळाचे कर्ज 20 टक्के, बँकांचा सहभाग 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे. महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे. कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखपर्यंत व अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
एक लाखापर्यंत थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबविण्यात येते. या योजनेत लाभार्थ्यांचा सहभाग नसून अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा, अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. परतफेडीचा कालावधी 4 वर्षे असून या कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज अदा करावे लागत नाही. थकीत कर्जावर मात्र दरसाल दर शेकडा 4 टक्के दराने व्याज आकारण्यात येते.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही 10 लाख रुपयापर्यंतची कर्ज योजना आहे. कृषि संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसायांकरीता कर्जावरील व्याज परतावा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आहे. कर्जासाठी नोंदणी केल्यानंतर बँकेमार्फत घेतलेल्या 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम 12 टक्के दराने अनुदान स्वरुपात दिली जाते.
गट कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेंतर्गत विहित वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, नोंदणीकृत कंपनी अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणी करीता कर्ज दिले जाते. या कर्जावरील व्याज परतावा केला जातो.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेंतर्गत देशातील उच्च शिक्षणासाठी 10 लाख व परदेशी उच्च शिक्षणासाठी 20 लाखापर्यंतच्या बँक कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा केला जातो. देशांतर्गत अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषि अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रमाचा समावेश असावा. परदेशी अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, विज्ञान कला या अभ्यासक्रमाचा समावेश असावा.
महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा कर्ज योजना, राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मुल्य आधारित उद्योगाकरीता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा केला जातो. महामंडळाच्या योजनांची सविस्तर माहिती www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या 07152-232881 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा 8329983870, 7972029150 या क्रमांकावर उपलब्ध होऊ शकते.