विदर्भ राज्य आंदोलन समितीचे “विदर्भ मिळवू औंदा” मिशन ; सेलू येथे विदर्भ निर्माण यात्रेचे भव्य स्वागत
सचिन धानकुटे
सेलू : – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात स्वतंत्र विदर्भासाठी “विदर्भ मिळवू औंदा” ह्या मिशन अंतर्गत विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली. सदर यात्रा सेलू शहरात दाखल होताच स्थानिक विश्रामगृहात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या ११८ वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याकरिता विविध प्रकारचे आंदोलने देखील करण्यात आली. परंतु सत्ताधारी व विरोधकांच्या उदासीन धोरणामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आंदोलनाची धग वाढविण्याकरिता तसेच प्रभावी प्रचार प्रसार करण्याकरिताच विदर्भ निर्माण यात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अँड वामनराव चटप यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विदर्भ निर्माण यात्रा ही एकाच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारीला एक कालेश्वर (सिरोंचा) येथून तर दुसरी सिंदखेडराजा येथून निघाली व आज सेलू येथे दाखल झाली. रविवार ता. ५ मार्च रोजी सदर यात्रेचा नागपूर येथील संविधान चौकात समारोप केला जाणार आहे.
आजपर्यंत विदर्भातील जनता केवळ आश्वासनांच्या भरोशावर राहिली. विदर्भाच राज्य सक्षम होवू शकत नाही, असा दाखला सातत्याने देण्यात आला. विदर्भात मराठी भाषिकांची संख्या ८१ टक्के आहे. विदर्भात २६ पैकी २४ खनिजे असून वनसंपदाही विपुल प्रमाणात आहे. विज, पुरेसा पाऊस तसेच अन्नधान्यातही विदर्भ स्वंयपूर्ण आहे. त्यामुळे आता विदर्भ राज्यासाठी करु किंवा मरु असा निर्धार व्यक्त करीत येत्या ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यापुढे आंदोलन अधिक प्रखरपणे केले जाणार असल्याची माहिती यावेळी चटप यांनी दिली.