बालवयातच “दैविक”ला हनुमान चालीसा पठणाचा अनमोल बहुमान..! गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : ३ वर्षे ४ महिन्याच्या “दैविक”चा ४.५४ सेकंदाचा अनोखा विक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – येथील साई व्हाईट गोल्ड जिनिंगचे संचालक कपिल चांडक यांचा मुलगा “दैविक” ह्याने अगदी बोबड्या वयात हनुमान चालीसा पठणाचा अनमोल असा बहुमान प्राप्त करीत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला. दैविकच्या हनुमान चालीसा पठणाची दखल घेत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नुकतीच नोंद करण्यात आली आहे.
दैविक हा मुळचा पुलगांव येथील रहिवासी असून अगदी लहानपणापासूनच त्याला हनुमान चालीसा पठणाची सवय जडली. चांडक परिवारात नित्यनेमाने हनुमान चालीसा पठण केल्या जाते. त्यामुळे साहजिकच हनुमान चालीसेचे मंजुळ स्वर बालवयातच दैविकच्या कानावर पडत होते. तो एक वर्षाचा असल्यापासूनच त्याला हनुमान चालीसा पठणाचा छंद जडल्याचे त्याचे वडिल कपिल चांडक आवर्जून सांगतात. दैविक सध्या ३ वर्षे ४ महिन्याचा असून त्याने आपल्या बोबड्या बोलात अवघ्या ४.५४ सेकंदात हनुमान चालीसा पठण करीत एक अनोखा विक्रम आपल्या नावे नोंद केला. त्याच्या या कार्याची दखल घेऊन गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने त्याला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
दैविकच्या या अभूतपूर्व यशाबद्दल चांडक परिवारातील सदस्यांसह मित्रपरिवार तसेच वडिल कपिल व आई प्रिया यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.