बायकोच्या डोक्यात दगड घालून केली हत्या ; विष प्राशन करीत नवऱ्याचीही आत्महत्या ; आंजी येथील घटनेने खळबळ
किशोर कारंजेकर
वर्धा : – बायकोच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत तीची हत्या केल्यानंतर नवऱ्यानेही विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल आंजी(मोठी) येथे घडली. शितल कुंदन कांबळे(वय४०) असे मृतक महिलेचे तर कुंदन ज्ञानेश्वर कांबळे(वय४५) असे मृतक पुरुषाचे नाव आहे.
यातील कांबळे कुटुंबिय हे आंजी(मोठी) येथील भावरकर यांच्याकडे कीरायाने राहत होते. त्या दोघांनाही तेरा वर्षाची मैत्री नामक मुलगी तर नऊ वर्षाचा सम्राट नामक मुलगा आहे. दोन्ही मुलांना दोन दिवस आधीच धामणगाव वाठोडा येथे मामाकडे पाठविण्यात आले होते. काल दिवसभरच कांबळे कुटुंबातील सदस्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने परिसरातील नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी लागलीच यासंदर्भात मृतक कुंदन यांचा भाऊ संजय कांबळे यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता घराच्या आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात आंजी येथील पोलीस चौकीत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता घराच्या बेडरूममध्ये दोन्ही पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. सदर घटनेची माहिती तत्काळ खरांगणा येथील पोलीस निरीक्षक शेगांवकर यांना देण्यात आली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी मृतक शितलच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्यात, तसेच बाजूलाच एक दगड देखील पडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधी पत्नीच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत तीची हत्या करण्यात आली व त्यानंतर पतीने विष प्राशन करीत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. सदर घटनेच्या वेळी दोन्ही मुलं मामाकडे असल्याने पती-पत्नी हे दोघेच घरी होते. त्यामुळे नेमकी ही हत्या का करण्यात आली व पतीने देखील आत्महत्या का केली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी अधिक तपास खरांगणा पोलीस करीत आहे.