जमीनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्यांचे बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन ; डॉ. अभ्युदय मेघेंच्या मध्यस्थीने आंदोलन मागे ; दोन दिवसात पुढील प्रक्रीया न केल्यास तिव्र आंदोलन
सचिन धानकुटे
सेलू : – जुनगड-गायमुख-कोलगांव-कोटंबा या राज्य महामार्गावरील अधिग्रहीत जमीनीच्या मोबदल्यासाठी येथील बांधकाम विभागासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज गुरूवारी डॉ अभ्युदय मेघे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. शासनाच्या संबधित अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पुर्ण न केल्यास दोन दिवसानंतर जिल्हा कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
राज्य महामार्ग ३२६ ला जोडणाऱ्या ह्या जुनगड-गायमुख-कोलगांव-कोटंबा रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले. परंतु शेतकर्यांना कोणतीही सुचना न देता त्यांच्या जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले. याविरोधात शेतकर्यांनी आवाज उठवीत वरीष्ठांकडे तक्रारी केल्यात, आंदोलने केली, परंतु बांधकाम विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ सदर रस्त्याचे मोजमाप करण्याबाबत तसा प्रस्ताव सादर केल्याचे लेखी कळविले. सदर कामही बंद करतो म्हणून शेतकऱ्यांना सांगण्यात आले, पण काम सुरूच असून असा कोणताही प्रस्ताव सादर न केल्याचे उघड झाल्यानंतर शेतकर्यांनी परत येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यासंदर्भात तत्काळ दखल घेत डॉ अभ्युदय मेघे यांनी अधिकार्यांशी चर्चा करून आंदोलनस्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन अखेर आज शेतकर्यांनी मागे घेतले. दोन दिवसात पुढील प्रक्रीया सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी हिवरे, हरिष पारसे, मंगेश वानखेडे, शुभम लुंगेसह अमोल कोटंबकर, दिपक तेलरांधे, निळकंठ वरटकर, विलास वांदीले, जितेंद्र देवतारे, दादाराव डंभारे, भगवान नगराळे, मिरा नवघरे, अशोक भोसले आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.