काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षाला दारुविक्री प्रकरणात अटक ; सिंदी पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक
सिंदी (रेल्वे) : – येथील काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षाच्या घरातच आज विदेशी दारुचा साठा आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी गजानन महादेव खंडाळे नामक दारुविक्रेत्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केल्याने पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.
राजकीय पक्षाच्या पदाआड अवैध व्यवसायात जम बसवल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु दारुबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यात काँग्रेसचा शहर उपाध्यक्षच अवैध दारुविक्रेता निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिंदी शहरातील काँग्रेसचा पदाधिकारी आपल्या घरात देशीविदेशी दारुचा व्यवसाय करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना आज मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष वार्ड क्रमांक सातमधील त्याच्या राहत्या घरी धाड टाकली असता, पोलिसांना त्याठिकाणी ऑफिसर चॉईस ब्लयू कंपनीच्या १२ शिशा आढळून आल्यात. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षाला अटक करीत त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कलम ६५ ई, ७७ अ नुसार कारवाई केली. सदर कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे, आनंद भस्मे, प्रशांत श्रीवास्तव, संदेश सोयाम, अमोल पिंपळकर, प्रदीप मस्के, उमेश खामनकर आदि कर्मचाऱ्यांनी केली.