तीन कोटींच्या बसस्थानकाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं..! भ्रष्ट कारभाराची पंचक्रोशीत चर्चा
सचिन धानकुटे
सेलू : – तीन कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला पहिल्याच पावसाळ्यात गळती लागली. त्यामुळे प्रवाशांना चक्क बसस्थानकावर छत्री घेऊन उभं राहावं लागतंय. विकास कामातील या भ्रष्ट कारभाराची सध्या अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
शहरात तीन कोटी रुपये खर्चून नव्यानेच बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. सदर कामात आधीच नियोजनाचा अभाव असल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. खासदार आणि आमदार यांनी मोठा गाजावाजा करीत सहा महिन्यांपूर्वीच बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. नव्याने बांधण्यात आलेल्या त्या बसस्थानकाला पहिल्याच पावसाळ्यात गळती लागली आहे. अनेक ठिकाणी छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांना याठिकाणी उभे राहण्यासाठी छत्रीचा आधार घ्यावा लागतो. बसस्थानक परिसरात सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे बसण्याच्या जागेवर सुद्धा पाणी गळाल्याने प्रवाशांना साधी बसायची सोय उरली नाही. त्यामुळे तीन कोटी रुपयांच्या विकास कामाची होणारी वाताहत बघता, यात किती रुपयांचा भ्रष्टाचार झाला असेल, याविषयी सध्या अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.