Breaking
ब्रेकिंग

वर्धा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडा अन्यथा भाजपचा उमेदवार बदला..! राणा रणनवरेंच्या दाव्याने खळबळ

2 6 8 5 6 3

सचिन धानकुटे

सेलू : – वर्धा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडा अन्यथा भाजपचा उमेदवार बदला, असा निर्वाणीचा इशारा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संघटन सचिव राणा रणनवरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला. त्यामुळे निवडणूका घोषित होण्याआधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

      राष्ट्रवादी काँग्रेस भाजपामध्ये नाही तर सरकारमध्ये सहभागी आहे. सरकारचा एक घटक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वर्धा विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर बांधणी झाली असून “या” मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला दावा मजबूत केला आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. महायुतीतून हिंगणघाट आणि आर्वी भाजपला, देवळी-पुलगांव शिवसेना तर वर्धा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्याचे राणा रणनवरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला न सोडल्यास निदान भाजपचा उमेदवार तरी बदला, अन्यथा आम्ही भाजपचं काम करण्यास बंधनकारक नाहीत, असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

      अजितदादांच विकासाच राजकारण पाहता विकासकामांची ऐशीतैशी करणाऱ्याला पुन्हा उमेदवारी न देता जिल्ह्यातील हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सोडला पाहिजे. याठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा आमदार आहे, राज्यात तसेच केंद्रात सत्ता देखील आहे. परंतु त्यामानाने मतदारसंघाचा विकास काही झाला नाही. विनाकारण विजेच्या खांबांना सजविण्यात आले, ते कशासाठी हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय करण्यात आलायं. धरणातील गाळ, पांदन रस्ते, सिंचनाची सोय, महावितरणच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला हवा होता, मुलभूत विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांच्या सोयीसुविधा लक्षात न घेता कमीशनखोरीमळे विकासाचा बट्टयाबोळ करण्यात आल्याचा आरोप यावेळी राणा रणनवरे यांनी केला. वर्ध्यात एकही रस्ता असा नाही की ज्याला खड्डा नाही. निव्वळ बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि रस्त्यावर रस्ता करण्यास आमदारांनी प्राधान्य दिले. केंद्राच्या निधीला आमदार महोदयांनी आपला निधी समजून केवळ मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे वर्धा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडा अन्यथा भाजपचा उमेदवार बदला असा निर्वाणीचा इशारा राणा रणनवरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 5 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे