पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रदर्शनीतील साहित्याची पळवापळवी..! कोट्यावधीचा निधी पाण्यात, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
सचिन धानकुटे
वर्धा : – पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रदर्शनीतील साहित्याची नागरिकांकडून पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी शहरात उघडकीस आला. कोट्यावधी रुपये खर्च करीत थाटण्यात आलेल्या प्रदर्शनीतील साहित्याची एकीकडे पळवापळवी होत असताना दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी मात्र निद्रावस्थेतचं असल्याचे चित्र आहे.
वर्ध्यात पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच पार पडला. याकरिता दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित होते. याकरिता शहरातील स्वावलंबी मैदानावर दोन भव्य असे शामियाने उभारण्यात आले होते. यातील एकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तर दुसऱ्या शामियान्यात पीएम विश्वकर्मा योजनेचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन प्रदर्शनी लावण्यात आल्या होत्या. सदर कार्यक्रम शासकीय असल्याने कार्यक्रमानंतर सगळ्या साहित्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही प्रशासनाची होती. परंतु याठिकाणी तसे न होता प्रदर्शनीच्या ठिकाणी पडून असलेल्या लाकडी आणि लोखंडी साहित्यासाठी आज सकाळपासूनच नागरिकांची झुंबड उडाली. यात लाकडाच्या छोट्यामोठ्या कपाटापासून बाकडे, प्लॉयवुडचं साहित्य आणि टेबलासह तत्सम साहित्य नागरिकांनी मिळेल तसं गोळा करून पळवापळवी करण्यात धन्यता मानली. कोणी डोक्यावर तर कोणी वाहनातून अशाप्रकारे शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावतानाचे चित्र कदाचित प्रथमच या गांधी जिल्ह्यात घडले. सदर प्रकाराला जिल्हा प्रशासनाची एकप्रकारे मूकसंमती असल्याचे दिसून येते. कारण त्यांनी आयोजनांसाठी जेवढे अथक परिश्रम घेतलेत, कदाचित साहित्याच्या नियोजनासाठी तेवढे परिश्रम घेण्याची तसदी त्यांना घेता आली नसावी. कोट्यावधी रुपये खर्च करीत मांडलेल्या या प्रदर्शनीचं असं पळवापळवीचं प्रदर्शन हेही नसे थोडके..!