वर्ध्यात राशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या “शिंगरु”सह एकास अटक ; ट्रकसह १४ लाख ४६ हजारांचा तांदूळ जप्त
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यात राशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या “शिंगरु”सह एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई समुद्रपूर तालुक्यातील कोल्ही शेतशिवारात करण्यात आली. या कारवाईत एका आयशर ट्रकसह १४ लाख ४६ हजारांचा १४६ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला आहे.
समुद्रपूर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कोल्ही येथील वामनराव भाईमारे ह्यांच्या शेतातील गोडाऊनमधून राशनच्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे कोल्ही शेतशिवारातील भाईमारे यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात राशनच्या तांदळाचा साठा आढळून आला. याप्रकरणी एम एच ३४ बिजी १३४५ क्रमांकाचा आयशर ट्रक तसेच त्याचा चालक अंकित धर्मेंद्र कऱ्हाडे(वय२६) रा. वागधरा, ता. वणी, जिल्हा यवतमाळ आणि श्रीकांत प्रभाकर शिंगरु(वय२६) रा. हिंगणघाट अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात पोलिसांनी “शिंगरु”ची सखोल चौकशी केली असता ट्रकमधल्या १४६ कट्टया संदर्भात अधिकृत माहिती देण्यात तो असमर्थ ठरला. त्यांच्याकडे याविषयी कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री परवाना नसल्याचे आणि तो तांदूळ राशनचाचं असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आयशर ट्रकसह १४६ कट्टे तांदूळ असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत याप्रकरणी दोघांवर जिवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
राशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेताच जिल्ह्यात तांदळाचा काळाबाजार करु पाहणाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.