“त्या” आत्महत्या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा ; आर्वीत रास्त भाव दुकानदारांचे धरणे आंदोलन
राजू डोंगरे
आर्वी : – स्थानिक शिवाजी चौकात आज रास्त भाव दुकानदारांनी नारे निदर्शने व धरणे आंदोलन केले. सदर आंदोलनस्थळी आमदार दादाराव केचे, उपविभागीय अधिकारी सिरसाट तथा तहसीलदार यांनी भेट देऊन निवेदन स्विकारत यावर त्वरित तोडगा काढण्याचे यावेळी आश्वासन दिले.
स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून देण्यात येणारे कमीशन न मिळाल्याने तालुक्यातील दुकानदार मोरेश्वर जयसिंगपुरे यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा नोंद करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आज शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी दिलेल्या निवेदनात सन-२०१३ पासून अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला. त्यानुसार लाभार्थी कार्डधारकांना ई-पॉस मशिनवर धान्य वाटप करण्यात येत आहे. धान्य वाटपानुसार होणारे कमिशन शासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसील कार्यालयात सदर कमिशनची रक्कम दुकानदारांच्या खात्यात वर्ग करण्याकरीता देण्यात येते.
परंतु तहसील कार्यालयातील असंतुष्ट कर्मचारी स्वतःच्या आर्थिक हिताकरीता अनेक दिवस दुकानदारांच्या खात्यात कमिशनच वर्ग करीत नाही. या कारणामुळे दुकानदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. शासनाने जानेवारी-२०२३ ते मे २०२३ पर्यंत होणारे कमिशन देण्याकरीता संबंधित कार्यालयात पाठविले, परंतु आर्वी तालुका कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांनी माहे जुलै-२०२३ पर्यंत सदर कमिशन दुकानदारांच्या खात्यांत वर्गच केले नाही.
त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे आर्वी तालुक्यातील रास्तभाव दुकानदार मोरेश्वर जयसिंगपुरे यांनी ता.२० जुलै रोजी सकाळी आठ वाजता आत्महत्या करून आपले जीवन संपविले. मोरेश्वर जयसिंगपुरे यांचा मुलगा अनुप जयसिंगपुरे यांनी पोलीस विभागाला दिलेल्या निवेदनात आर्थिक परिस्थितीला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या कमिशनची रक्कम दुकानदारांच्या बँक खात्यात वर्ग न केल्यामुळेच मोरेश्वर जयसिंगपुरे यांना आर्थिक अडचणींचा सामना करीत आपले आयुष्य आत्महत्या करून संपविले आहे. या संबंधाने चौकशीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिनांक ता.२७ जुलै रोजी देण्यात आले. परंतु यासंबंधी आजवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे प्रकरण पध्दतशिरपणे दाबण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न असल्याचे आढळून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेली कमिशनची रक्कम स्वतःच्या आर्थिक लाभाकरीता दुकानदारांच्या बँक खात्यावर वर्ग न करणाऱ्या व दुकानदारास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून जयसिंगपुरे कुटूंबियांना न्याय प्रदान करावा व अशा प्रकारच्या घटनाची भविष्यात पुनरावृत्ती होवू नये याची दक्षता प्रशासनाने बाळगावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.