राष्ट्रीय विद्यार्थी दिन जिल्ह्याभरात साजरा

सचिन धानकुटे
वर्धा : – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी राष्ट्रीय विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अभाविपच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंगणघाट शाखेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते नितीन सुकळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य उमेश तुळसकर तसेच रमेश धारकर यांनी सुद्धा विचार व्यक्त केले.
वर्ध्यातील अग्निहोत्री महाविद्यायात अभाविप द्वारे तब्बल २०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रकांत रागीट यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मार्गदर्शन देत शुभेच्छा दिल्यात. दरम्यान मंचावर राष्ट्रीय कलामंचाचे अखिल भारतीय सहप्रमुख प्रदीप मेहता, अभाविप विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष डॉ राजेश लेहकपुरे, प्रदेश सहमंत्री आर्या पाचखेडे, वर्धा नगर सहमंत्री सुजान चौधरी, कार्यक्रम संयोजक शिवम काळे उपस्थित होते. याशिवाय अभाविप हिंदी विद्यापीठ शाखेकडून सुद्धा वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अशाप्रकारे अभाविपच्या विविध महाविद्यालयीन आणि शहर शाखांकडून सेलू , समुद्रपूर, वडनेरसह संपूर्ण जिल्ह्यात स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.