कापसाच्या दरात महिनाभरानंतर सुधारणा ; सेलूच्या उपबाजारपेठेत कापसाला ८ हजार १८५ रुपयांचा भाव

सचिन धानकुटे
सेलू : – येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेत महिनाभरानंतर कापसाच्या भावात काहिशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. येथील बाजारपेठेत आज मंगळवारी कापसाला ८ हजार १८५ रुपयांचा भाव मिळाला आहे.
मागील वर्षी कापसाला मिळालेला दर पाहता यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने घरातच कापसाची साठवणूक केली. कापसाला मुहूर्तावेळी नऊ हजारांचा दर मिळाला, परंतु कालांतराने कापसाचे भाव ७ हजार ८०० रुपयापर्यंत खाली आलेत. कापसाच्या दरात सहा महिन्यानंतरही सुधारणा होत नसल्याने भाववाढीच्या अपेक्षेत असलेला कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता. परंतु आता पुन्हा एकदा कापसाच्या दरात काही प्रमाणात का होईना सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज मंगळवारी येथील बाजार समितीत ६९ कापसाच्या गाड्यांची आवक झाली असून कापसाला ८ हजार ६५ रुपयांपासून ८ हजार १८५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तर फरतड कापसाला ७ हजार ६७५ रुपयाप्रमाणे भाव मिळाला. यासोबतच तुरीला ७९०० ते ८७००, सोयाबीन ४९५० ते ५३००, हरभरा ४३०० ते ४७८० व गव्हाला २१०० ते २५०० रुपयांप्रमाणे दर मिळत आहे.