वर्ध्यात बनावट नोटा चलन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त : चार आरोपींना ठोकल्या बेड्या
किशोर कारंजेकर
वर्धा : बनावट नोटांच्या चलनाच पोलिसांनी पर्दाफाश केला असून शहरात बनावट नोटा चलन करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या देखरेखीत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने केली.
काही युवक बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती होती. हे रॅकेट मागील काही दिवसांपासून शहरात सक्रीय झाले हाेते. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक या टोळीच्या मागावर होते. अखेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी पवनार येथील तीन, मदनी गावातून एका आरोपीला अशा चार आरोपींच्या टोळीला अटक केली. विशेष म्हणजे त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बनावट नोटा अशी एकूण ९४ हजार रुपयांची रोकडही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बनावट नोटांचे ‘दिल्ली’ कनेक्शन
चारही आरोपी हे दिल्ली येथून तसेच लगतच्या मोठ्या शहरातून या बनावट नोट वर्धा सह लगतच्या शहरात आणत होते. इतेकच नव्हेतर पानटपरी, पेट्राेलपंप तसेच बाजारपेठेत या बनावट नोटांचे चलन करीत असल्याची माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली आहे.
अशी अटक आरोपींची नावे
क्राईम इंटेलिजन्स पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी प्रीतम प्रदीप हिवरे (२३) रा. पवनार,स्वप्नील किशोर उमाटे (२४) रा. पवनार, निखील अशिनराव लोणारे (२४) रा. श्रीराम टाऊन वर्धा, साहिल नवनीतराव साखरकर (२३) रा. पवनार यांना अटक बनावट नोटा चलन करताना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व आरोपींकडून ५०० रुपयांच्या तब्बल १८८ बनावट नोटा जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.