एसबीआयच्या एटीएमला गळती, चिखलात शोधावं लागतं एटीएम..!
सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक एसबीआय बँकेच्या एटीएमला गळती लागल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला. परिणामी एटीएमपर्यंत पोहचण्यासाठी ग्राहकांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.
शहरातील एसबीआय बँकेच्या परिसरात अगदी प्रवेशद्वारावर एटीएम मशीन आहे. त्याठिकाणी पावसाचे पाणी सातत्याने गळत असल्याने अख्खा परिसर जलमय झाला. त्यामुळे ग्राहकांना पाण्यातून एटीएमपर्यंतचा रस्ता गाठणे अगदी कठीण झाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी यावर उपाययोजना म्हणून पाणी साचलेल्या भागात चक्क खरड्याचे खोके अंथरलेत. अधिकच्या पाण्यामुळे त्या खरड्यांच्या कागदांचा परिसरात अक्षरशः चिखल तयार झाला. ग्राहकांना आता त्या चिखलातूनचं एटीएमपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे.
बँक ग्राहकांकडून एटीएमच्या वापरासाठी एक ठराविक रक्कम वसूल करते. मात्र त्या मोबदल्यात ग्राहकांच्या सोयीसुविधांचा मात्र बँक व्यवस्थापनाला विसर पडल्याचे दिसून येते.