वर्ध्यात दारु वाहतूकीचा “पुष्पा” पॅटर्न..! दुधाच्या कॅनमधून चक्क देशी-विदेशीची वाहतूक
सचिन धानकुटे
वर्धा : – चंदनाच्या तस्करीसाठी वापरला “पुष्पा” पॅटर्न चक्क दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुच्या वाहतूकीसाठी वापरण्यात आल्याचं आज उघडकीस आलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब ते वर्धा मार्गावर दुधाच्या कॅनमधून दारुची वाहतूक करणाऱ्या एकास आज अटक केली. प्रशांत रामेश्वर कोंबे(वय४२) रा. साटोडा असे अटक करण्यात आलेल्या दारु विक्रेत्याचे नाव आहे. सदर प्रकारामुळे पोलीस प्रशासन देखील काहीसं चक्रावून गेलं आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी देवळी तालुक्यात गस्तीवर होते. दरम्यान त्यांनी देवळी येथे सापळा रचला. यावेळी कळंबवरुन वर्ध्याच्या दिशेने येणाऱ्या एम एच ३२ एल ३७६३ क्रमांकाच्या हिरो होंडा ग्लॅमर मोटारसायकलवरुन दुधाच्या कॅनमधून चक्क दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. साटोडा येथील प्रशांत कोंबे याने मोटारसायकलच्या दोन्ही बाजूला लावलेल्या दुधाच्या कॅनमधून देशी विदेशी दारू भरून विक्रीसाठी आणल्याचे पाहून पोलिसही चक्रावून गेलेत. यावेळी पोलिसांनी दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारुच्या ३७५ एमएलच्या २४ शिशा, दोन लिटरचे सात सिलबंद बम्परसह एक मोटारसायकल व दोन कॅन असा एकूण १ लाख २९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशांत कोंबे याच्यासह कळंब येथील एमपी वाईन शॉपचा चालकमालक मनिष जयस्वाल अशा दोघांवरही देवळी पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, मनोज धात्रक, अरविंद येणूरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.