वर्धेकरांचा शोध मोहितेंचे सुबोध : रिकाम्या रणांगणात मोहिते ठरताहेत सक्षम : राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोहितेची एलर्जी

किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्ह्यातील राजकीय नेत्यांपुढे ऑपरेशन 2024 समोर आहे. या राजकीय चढाओढीत सध्या लोकसभा आणि विधानसभा अशा दोन विविध स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत टीकायचे असेल तर स्पर्धक हेरले पाहिजे, असे म्हणतात. पण राजकीय स्पर्धेत जिंकायचे असेल तर मात्र (विरोधक) शत्रू हेरले पाहिजे, असेच म्हणणे भाग पडते. असाच अनुभव वर्ध्याच्या राजकारणात येत आहे. यामुळेच दम नसलेले राजकीय पुढारी आम्हाला बाहेरचा नेता नकोय असं तुनतूनं वाजवायला लागले आहे. राजकीय नेत्यांना हे तुनतूनं वाजवायला लावणारे काही राजकीय दलालदेखील बोट्या सोलू लागल्याचे दिसतेय. त्यामुळे वर्ध्याच्या राजकारणात कोण मित्र आणि कोण शत्रू हे ओळखण्याची वेळ पुढील काळात अनेक राजकारण्यांवर येणार आहे.
वर्ध्याच्या राजकारणात अनेक जण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांसाठी बाशिंग बांधून आहेत. यात चारवेळा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हुकलेले शिवसेनेचे सदस्य समीर देशमुख, दोन वेळा वर्धा विधानसभेत पराभूत झालेले शेखर शेंडे, याशिवाय नाही विधानसभा तर जिल्हा परिषदेत तरी तिकीट मिळेल अशी आशा असणारे चेलेचपाटे रिंगणात आहेत. अशात गेल्या काही वर्षांपासून वर्ध्याच्या राजकारणात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे देखील वर्ध्याचेच झाले आहेत. त्यांनी मागील दुर्गोत्सवात तर अनेक मंडळांना फक्त माझा फोटो लावा आणि लंगरसाठी ‘पाहिजे ते न्या’ चा फंडा वापरला होता. अगदी तेव्हा पासूनच वर्धेकरांना ते हवेहवेसे वाटू लागले होते. ही वस्तूस्थिती विसरणे आता तरी शक्य नाही. असे असताना मात्र महाविकास आघाडीतील जुन्या मातब्बरांचा हात वर्गणीसाठी खिशात गेला तरी तो लवकर बाहेर देखील निघत नाही. पण कधी कधी सक्रिय दलालांसाठी “शिग” दिली जाते.
महाविकास आघाडीतील नेत्यांना मोहिते सक्रिय झाल्याने घाम फुटला असावा म्हणूनच राजकीय दलालांचा आधार घेत मोहिते यांना विरोध करण्याची भूमिका वठविली जात आहे. परंतु या भूमिकेला शह देण्यासाठी नव्या दमाने कार्यरत असणारे सरचिटणीस अतुल वांदिले, वैभव तिजारे, रोशन तेलंग यासारखी मंडळी मागेदेखील सरकणार नाही, हेही निश्चित. ज्यांचे धाबे दणाणले त्यांनी अनेकदा राजकारणात एकमेकांविरोधात कुरघोडी करण्यात वेळ घालवला आहे. यांनी कधी भाजपला मदत करीत नेत्यांना पाडण्याचा पायंडा निर्माण केला आहे. ज्या नेत्यांनी मोहिते विरोधात दंड थोपटले, त्यांच्याच बाजूला बसणाऱ्या एका नेत्याने मोहितेना फोन करून आम्ही तुमच्याच बाजूला आहे, पण दाखवासाठी राहावे लागते, असे म्हणून पडीत नेत्याचे उकटे फेडण्याचा प्रयत्न तर केला नसावा ना !. तेच आता सुबोध मोहिते यांच्या मागे लागले असल्याचे चित्र आहे. यात राजकीय दलाल कोण याचा शोध मात्र पुण्या – मुंबई मधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी घेतला म्हणजे मिळवलं.