महिलेच्या बॅगमधील साडेचार तोळ्याचे दागिने लंपास, सेलूच्या बसस्थानकात बसमध्ये चढतांनाची घटना
सचिन धानकुटे
सेलू : – महिलेच्या बॅगमधील साडेचार तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल बुधवारला स्थानिक बसस्थानकात दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बल्लारशा येथील रहिवासी शेळके दाम्पत्य काल बुधवारला येथील बसस्थानकात वर्ध्याला जाण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी सिंदी ते वर्धा बसमध्ये चढण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तो गर्दीमुळे अयशस्वी झाला. भामट्यांनी ह्याच गर्दीचा फायदा घेत शोभा महादेव शेळके यांच्या हँड बॅगच्या आतमध्ये असलेल्या पर्समध्ये ठेवून असलेली सोन्याची पोत, चपलाकंठी, नथ आणि कानातले असा साडेचार तोळ्यांचा ऐवज लंपास केला. यावेळी त्यांनी सिंदी येथून आलेल्या बसमध्ये न जाता दुसऱ्या बसने सेलू येथून वर्ध्याच्या दिशेने जातांना यशवंत चौकाच्या आधी आपल्या बॅगची तपासणी केली असता सोन्याचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच खाली उतरून सगळीकडे शोधाशोध केली, आपल्या झडशी येथील नातलगांना देखील कळविले. परंतु दागिने कुठेही मिळून आले नाही. अखेर याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रितम निमगडे व ज्ञानेश्वर कोराते यांनी तत्काळ बसस्थानक परिसर गाठून पंचनामा केला. यावेळी तीन कोटी रुपयांच्या बसस्थानकात साधा सीसीटीव्ही कॅमेरा देखील नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.