भामटा मंगेश चोरेसह उपसंचालकपदाची अपेक्षा बाळगणाऱ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ; ३ लाख रुपयासह घेतला १५ लाखांचा कोरा धनादेश
किशोर कारंजेकर
वर्धा : – एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला बलात्कारासह विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून बदनामीच्या नावाखाली ३ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी तथाकथित पत्रकारासह उपसंचालक पदाची इच्छा बाळगणाऱ्या इसमाविरोधात सावंगी (मेघे) पोलिसांत काल शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश विठ्ठलराव चोरे रा. नेरी पुनर्वसन असे त्या भामट्या पत्रकाराचे तर देवानंद बाराहाते रा. येळाकेळी असे त्या उपसंचालकपदाची हाव असणाऱ्या आरोपी इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनेश चन्नावार असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांची येळाकेळी येथे नामांकित शिक्षण संस्था असून ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. यातील आरोपी देवानंद बाराहाते यांनी सदर संस्थाध्यक्ष यांना संस्थेत उपसंचालकपदाची मागणी केली. सदर मागणीची पूर्तता न केल्यास त्यांना बलात्कार तसेच विनयभंगाच्या कटकारस्थानात अडकवून शाळेची बदनामी करण्याची धमकी दिली. याकरिता आरोपी मंगेश चोरे ह्याच्या माध्यमातून संबंधित आरोपीने सदर संस्था चालकाला २५ लाख रुपयांची मागणी केली. यापैकी ३ लाख रुपये तसेच १५ लाख रुपयांचा कोरा धनादेश मंगेश चोरे ह्याच्या निवासस्थानी दोन्ही आरोपीने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात शनिवारी आरोपी मंगेश विठ्ठलराव चोरे व देवानंद बाराहाते या दोन्ही आरोपी विरोधात भादंवि कलम ३८४, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.