वीज पडल्याने कडूनिंबाच्या झाडाखाली बांधून असलेली बैलजोडी गतप्राण ; गोंदापूर शेतशिवारातील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – कडूनिंबाच्या झाडाखाली बांधून असलेल्या बैलजोडीच्या अंगावर वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच गतप्राण झाल्याची घटना गोंदापूर शेतशिवारात काल रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे जवळपास ९५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
रेहकी येथील शेतकरी सतिश नामदेवराव शिंदे यांची समृद्धी महामार्गालगत गोदांपूर शिवारात शेती आहे. काल बुधवारला सायंकाळच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने बैलजोडी ही कडूनिंबाच्या झाडाखाली बांधून ठेवली होती. काल रात्री बारा वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसादरम्यान मोठ्या प्रमाणात विजांचा देखील कडकडाट झाला होता. यावेळी बैलजोडीच्या अंगावर वीज पडल्याने ती जागीच गतप्राण झाली. आज सकाळी जेव्हा सालगडी शेतात पोहचला, तेव्हा सदर घटना त्यांच्या लक्षात आली. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी उमाकांत टोळ यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यात शेतकऱ्याचे जवळपास ९५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.