उंच भरारी घ्या पण शेवटच्या घटकाला विसरू नका – खासदार अमर काळे : व्हॉईस ऑफ मीडियाचा पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा कौतुक सोहळा उत्साहात साजरा
वर्धा : – विद्यार्थ्यांनो आपण घवघवीत यश मिळविले. आपल्या या यशात अनेकांचे योगदान असेल, याहीपेक्षा उंच भरारी घ्या..! पण शेवटच्या घटकाला विसरू नका..! समाजात सर्वसामान्य माणसाला मदतीच्या हाताची गरज आहे आणि त्यासाठी आपण काहीही बनलात तर तत्परतेने मदतीसाठी समोर या..! असे आवाहन खासदार अमर काळे यांनी वर्ध्याच्या अनुसया सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा या कार्यक्रमात केले. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार बांधवांच्या संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा आणि शालेय साहित्याच्या किटचे वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांचा देखील व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या प्रदेश सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ सरिता गाखरे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ वझुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश समन्वयक राणा रणनवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण हिवरे, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे, शिवसेनेचे वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम टोणपे, व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, संचालक प्रदीप बजाज, सक्षम एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहन कठाणे, व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खासदार अमर काळे म्हणाले की, विद्यार्थी हा सतत अभ्यास करून यश संपादन करतो, पण अभ्यासासोबतच खेळाच्या मैदानावर देखील सराव अत्यावश्यक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळाकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो कितीही मोठे व्हा, डॉक्टर बना..! इंजिनियर बना..! किंवा कलेक्टर बना, पण सर्वसामान्य माणसांच्या मदतीला धावून या. सोबतच आई-वडिलांच्या दिलेल्या संस्काराला विसरू नका..! असे आवाहन अमर काळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ वझुरकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. भविष्यात शिक्षण घेऊन मोठे झालेले विद्यार्थी देश घडवू शकतात असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात भाजपच्या सरिता गाखरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन पुढेही मोठे यश संपादन करा, असे सांगितले. तसेच व्हॉईस ऑफ मीडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा देखील केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणा रणनवरे यांनी पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, याशिवाय पत्रकार आणि त्यांच्या पाल्याला शैक्षणिक सहाय्य लागल्यास पुणे अथवा मुंबई यासारख्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी मदत लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आपण सदैव मदतीचा हात पुढे करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
युवा नेते निहाल पांडे आणि प्रदीप बजाज तसेच प्रवीण हिवरे यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात. जिल्हा माहिती अधिकारी श्वेता
पोटूडे यांनी देखील यावेळी पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले. व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष यांनी संघटनेची पंचसूत्री विषद केली, जे उपक्रम संघटनेकडून राबविल्या जातात, त्याची माहिती यावेळी देण्यात आली. सेलू येथील जेष्ठ पत्रकार प्रफुल लुंगे यांनी यावेळी बोलताना पत्रकार करीत असलेले संघर्ष आणि त्यातही व्हॉईस ऑफ मीडिया कडून बजावली जाणारी भूमिका विषद केली. पत्रकार एकनाथ चौधरी यांनी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्याचे महत्व विषद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ता संजय धोंगडे यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर आणि सहकाऱ्यांनी याप्रसंगी खासदार अमर काळे यांचा नागरी सत्कार केला.
या कार्यक्रमा दरम्यान जिज्ञासा संजय धोंगडे घोराड, स्नेहांशू अजय मोहोड हिंगणघाट, जयंत राजूभाऊ कोहळे झडशी, डॉ मानसी नरेंद्र देशमुख वर्धा, युगा प्रफुल्ल लुंगे सेलू , डॉ निखिल पंढरी काकडे वर्धा, बादल दिलीप ठाकरे आर्वी, सत्यम रवींद्र कोटंबकार सेलू या पदवीधर विद्यार्थ्यांचा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण अवनी प्रशांत कलोडे सिंदी (रेल्वे), तेजस संजय धोंगडे घोराड, काजल भारत घवघवे केळझर, नियती नरेंद्र देशमुख वर्धा, भैरवी नितीन आष्टीकर आर्वी, काव्या किशोर कारंजेकर वर्धा, सॄजन गजानन बाजारे कारंजा, माही राजेश अंबुलकर वर्धा, संचाली संजय बोंडे वर्धा, यश महेंद्र देशमुख वर्धा, यश प्रमोद एडाखे आर्वी, महिमा टावर मडावी वर्धा, समर्थ सुनिल पारसे आर्वी, अभिनव विजय झेंडे आर्वी आदी विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची किट ज्यात स्कूल बॅग, रजिस्टर, टिफिन बॉक्स, पाणी बॉटल, कंपास आदी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन निलेश पिंजरकर यांनी तर आभार पंकज गादगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भ उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, सचिव एकनाथ चौधरी, निलेश पिंजरकर, पंढरी काकडे, शैक्षणिक सेलचे अध्यक्ष मंगेश काळे, सेलू तालुकाध्यक्ष सचिन धानकुटे, देवळी तालुकाध्यक्ष गणेश शेंडे, आशिष इझनकर, सचिन पोफळी, अरविंद गजभिये यांनी प्रयत्न केले.