सेल्फीच्या नादात चौघांना जलसमाधी ; घोडाझरी तलावातील घटना
आरएनएन न्युज
चंद्रपूर : – सेल्फी काढण्याच्या नादात चार जण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात आज रविवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असल्याने घोडाझरी तलावात भरपूर पाणी आले आहे. दरम्यान आज रविवारी वरोरा तालुक्यातल्या शेगांव येथील आठ युवक धबधब्याच्या पाण्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे आले होते. यावेळी त्यांना सेल्फी काढण्याच्या मोह आवरता आला नाही. सेल्फीच्या नादात यातील एकाचा पाय घसरुन तो तलावाच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या पाठोपाठ आणखी तीन युवक पाण्यात पडलेत. यावेळी आठ युवकांपैकी चार युवकांना दुर्दैवाने जलसमाधी मिळाली. तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात चार युवकांना आपला जीव गमवावा लागला. यातील मृतकांमध्ये मनीष श्रीरामे(वय२६), धीरज झाडे(वय२७), संकेत मोडक(वय२५), चेतन मांदाडे(वय१७) यांचा समावेश आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.