सिंदी कृउबासच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे केशरीचंद खंगार ; माजी सभापतीसह उपसभापतीचा केसाने गळा कापल्याची चर्चा
सचिन धानकुटे
सेलू : – येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे केशरीचंद खंगार तर उपसभापती पदी काँग्रेसचे प्रमोद आदमने यांची आज अविरोध निवड करण्यात आली. सदर निवड जरी अविरोध झाली असली, तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी माजी सभापती व उपसभापतीचा केसाने गळा कापल्याची चर्चा येथे चांगलीच रंगली होती.
येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागांवर महाविकास आघाडीने एकहाती विजय संपादित केला होता. आज सोमवारी येथील बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुचिता गुघाणे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुकाराम चव्हाण यांनी कामकाज सांभाळले. यात सभापती पदासाठी सेलडोह येथील केशरीचंद खंगार यांनी तर उपसभापती पदासाठी तळोदी येथील प्रमोद आदमने ह्या दोघांनीच अर्ज सादर केल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती विद्याधर वानखेडे यांचे नाव सभापती पदासाठी तर काँग्रेसकडून माजी उपसभापती काशिनाथ लोणकर यांच्या नावाची उपसभापती पदासाठी जोरदार चर्चा होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी दोघांचाही केसाने गळा कापला. एवढेच नाही तर निकालानंतरच्या आनंदोत्सवापासून दोन्ही माजी पदाधिकारी कोसो दूर असल्याचे दिसून आले. संबंधित नेते “त्या” दोघांनाही फोटो काढण्यासाठी आवाज देत होते, परंतु त्यांनी काही नेत्यांच्या हाकेला “ओ” दिला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची “मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर” अशीच काहीशी गत झाल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले होते.
*झारीतील “त्या” शुक्राचार्यामुळे “लोणकर” ह्यांचा राजीनामा*
काँग्रेसच्या एका झारीतील शुक्राचार्याने आपल्याच पक्षातील एका पदाधिकाऱ्याला डावलण्यासाठी रचलेला कट यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून ऐनवेळी भलत्यालाच संधी दिल्याने येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यात चांगलाच रोष निर्माण झाला होता. याचाच परिणाम माजी उपसभापती काशिनाथ लोणकर ह्यांनी आपल्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदासह बाजार समितीच्या संचालक पदाचा देखील यावेळी राजीनामा दिला. एवढेच नाही तर पक्षाचे अन्य पदाधिकारी व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते देखील राजीनामा देणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पक्षाच्या अध:पतनासाठी कारणीभूत ठरलेला काँग्रेसचा “तो” झारीतील शुक्राचार्य कोण..? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.