भरधाव कार उड्डाणपूलावरुन कोसळली रेल्वे ट्रॅकवर ; पाचही प्रवासी गंभीर ; बोरखेडी शिवारातील घटना
किशोर कारंजेकर
वर्धा : – भरधाव कार अनियंत्रित होत थेट उड्डाणपूलावरुन रेल्वे ट्रकवर कोसळल्याची घटना जाम नागपूर महामार्गावरील बोरखेडी शिवारात घडली. सदर अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुट्टीबोरी येथील माया रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार वर्धा जिल्ह्याच्या सिमेवरील बोरखेडी शिवारात उड्डाणपूलावरुन थेट रेल्वे पटरीवर पडली. सदर कारच्या चालकास डुलकी लागल्याने अपघात घडल्याचे सांगितले जाते. यावेळी एकाच कुटुंबातील सदस्य कारमध्ये होते. कार खाली कोसळल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बुट्टीबोरी येथील माया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रेया बैस(वय२९), कविश काकडे(वय२७), ब्रोनदूत रोगो(वय२४) तीनही रा. नागपूर, मोहम्मद सादीक(वय३२), युसुफ सईद(वय३५) रा. हैदराबाद अशी अपघातात जखमींची नावं आहेत. मोहम्मद सादीक हा यावेळी कार चालवत होता.
सदर अपघातग्रस्त कार रेल्वे रुळावर पडल्याने काही काळ रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.