जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात पेंढे, शेरजे, पोहाणे त्रिकुटाची खोटे बिल रेकॉर्ड करून मालसुताई सुरूच : मुख्य कार्यकारी अधिकार्यांंच्या कारभारातून `विना सहकार, नही उद्धार`चीच चर्चा : बोला घुगे साहेब, पेंढेच्या कारभाराला आवर घालणार की नाही?
किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वर्धा उपविभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता शेरजे, उपअभियंता पोहाणे तसेच त्यांच्या स्वैर कारभाराला अभय देणारे कार्यकारी अभियंता पेंढे यांच्या त्रिकुटाने न वापरलेल्या साहित्याचे बनावट बिल रेकॉर्ड करून मालसुताई सुरू केली आहे. आरएनएन न्यूजने याचे पुरावे सादर केले आहे. पण मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यातील एकाही प्रकरणाची चौकशी सुरू न केल्याने “बिना सहकार नही उद्धार”चा प्रयोग जिल्हा परिषदेत सुरू आहे, अशीच चर्चा खुलेआमपणे होत आहे.
या सर्व प्रकारातून पाहिजे तसे करण्याचे धैर्य कार्यकारी अभियंता पेंढे, कनिष्ठ अभियंता शेरजे, तसेच उपअभियंता पोहाणे यांचे वाढले आहे. एक साधी बाब नमूद केली पाहिजे, ती अशी की प्लंबरला टेंडर क्लर्कच्या खुर्चीत कार्यकारी अभियंता पेंढे यांनी बसविले. त्यातून टेंडर मॅनेजमेंट सुरू झाले. प्लंबरला टेंडरक्लर्क करता येते काय, याची साधी चौकशीही मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केल्याचे दिसत नाही. यातून काय बोध घ्यायचा?
जिल्हा परिषदेच्या वर्धा बांधकाम उपविभागाच्या वतीने उपविभागासमोरील सिमेंट रस्त्याचे काम केले गेले आहे. नामधारी कंत्राटदारामार्फत हे काम केले तरी सूत्रधार शेरजे, पोहाणे, पेंढेचे त्रिकुटच आहे. कनिष्ठ अभियंता शेरजे यांनी या रस्ता कामात जीएसबीचे बिल रेकॉर्ड केले आहे. त्याची नोंद मोजणीपुस्तक क्रमांक ८२५६च्या पान क्रमांक दोनवर केली आहे. यात मोजमापाची नोंद केली गेली. त्यावर चेक अॅण्ड फाऊंड करेक्ट म्हणून उपअभियंता पोहाणे तसेच कार्यकारी अभियंता पेंढे यांनी स्वाक्षरी केली.
जीएसबी म्हणजे, ग्रॅन्यूलर सब बेस मटेरिअल. यात जीएसबी -१, जीएसबी -२, जीएसबी ३, असे भाग येतात. मेटल, वाळू, मुरुम मिक्सिंग करून त्याची ग्रेड ठरवून याचा वापर केला जातो. पण येथे मटेरिअलच्या नावाने कचरा वापरला. रस्त्याचे खोदकाम केले तर ते दिसेल पण याची चौकशी करण्याची हिंमत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे दाखवितील काय, हाच खरा प्रश्न आहे. या कामाला रेकॉर्ड केलेल्या एमबीचे पान क्रमांक दोन आज प्रसिद्ध करीत आहोत. कार्यकारी अभियंता पेंढे याने सादर केलेल्या कोणत्याही कामावर तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे स्वाक्षरी कशी करतात, पेंढेचे सर्व म्हणणे क्षणात मान्य कसे होते, यावर ज्याचा त्याने खुलासा केला पाहिजे. १ क्युबिक मीटरच्या जीएसबी कामात ४० एमएम मेटलचा वापर केला तर २३०० रुपये, त्यापेक्षा जास्त जा़डीच्या मेटलचा वापर केला तर २६०० ते २७०० रुपये मान्य होतात. त्यानुसार देयक काढले जाते. कनिष्ठ अभियंता शेरजे यांनी १९.११ क्युबिक मीटर वापरले. आणखी बर्याच बनावट नोंदी हाती आल्या आहेत.
कार्यकारी अभियंता पेंढे यांचे जीवलग विश्वासू कारंजा उपविभागातील कनिष्ठ अभियंता मलमकर तसेच आर्वीचे कनिष्ठ अभियंता वनस्कर आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांच्यात हिंमत असेल तर याच कनिष्ठ अभियंत्यांना सर्वांत जास्त कामे कां सोपविली गेली, याची चौकशी करावी. त्यांनी ही रेकॉर्ड केलेल्या कामाच्या मोजणीपुस्तकातील कामाची कागदपत्रे हाती आली आहेत.
जिल्हा परिषदेत अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. मो. ब. अप्पलवार प्रशासक होते. पण त्यांच्या कारकिर्दीत वचक होता. आता तर सबकुछ पेंढे कारभारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी केबीनची रंगरंगोटी करून किंवा अधिक देखणी करून चालत नाही तर कारभारातून त्याचा प्रत्यय येणे गरजेचे असते. तो सध्या तरी बांधकामचा आढावा घेतला तर दिसत नाही. देवळी उपविभागात चार नियमित कनिष्ठ अभियंत्याना कोठलेही काम न देता बसवून ठेवले आहे. कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांकडून काम करून घेतले जात आहे. मुख्यालयातील इमारतींची देखभाल कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यावर सोपविली गेली आहे. यातून काय बोध घ्यायचा तो सूज्ञांनी घ्यावा.