पक्षकारांच्या विश्रांतीवर अर्जनविसांचा दावा..! आमदार निधीतील गाळे विकल्याचा आरोप, अर्जनविसांचा गाळे विकत घेतल्याचा कांगावा : सेलूच्या तहसील कार्यालयातील प्रकार
किशोर कारंजेकर
वर्धा : – जिल्ह्यातल्या सेलू येथील तहसील कार्यालय परिसरात नव्यानेचं उभारण्यात आलेल्या पक्षकारांच्या विश्रांती कक्षावर दस्तुरखुद्द अर्जनविसांनीचं अतिक्रमण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या विश्रांती कक्षातील गाळे आम्ही विकत घेतल्याचा कांगावा एकीकडे अर्जनविस करीत आहेत, तर दुसरीकडे आमदार निधीतील गाळे विकण्याची वेळ आमदार यांच्यावर का आली, यासंदर्भात तालुक्यातील मतदारांत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सेलू येथील तहसील कार्यालय परिसरात आमदार निधीतून पक्षकारांच्या विश्रांतीसाठी एका सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. याकरिता जवळपास १४ लाख रुपयांचा शासकीय निधी देखील खर्च करण्यात आला. परंतु सध्या त्या सभागृहात येथील पाच अर्जनविसांनी आपली दुकानदारी थाटण्यासाठी चक्क अतिक्रमण केले. पाचही अर्जनविसांनी आपापल्या परीने त्या गाळ्यांना सुशोभित करण्याचे काम हाती घेतले आहे.
यासंदर्भात त्या गाळेधारकांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही काही फुकटात याठिकाणी आलो नाहीत, तर यासाठी चक्क नगदी पैसे मोजल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या या पक्षकारांच्या विसाव्यावर त्यांनी एकप्रकारे अतिक्रमणच केल्याचे दिसून येते. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उंबरठ्यावर असून या दरम्यानच स्थानिक आमदारांचा “घालघोपाटा” अचानक चव्हाट्यावर आला. त्यामुळे पक्षकारांच्या विश्रांतीसाठी असलेल्या “त्या” सभागृहातील गाळे विकण्याची वेळ आमदार महोदयांवर का आली..? हा मतदारांसाठी सध्या संशोधनाचा विषय ठरला आहे.