निराधारांना वाऱ्यावर सोडून महसूल सहाय्यक “पाटील” दलालांच्या दावणीला..! नायब तहसीलदार असल्याच्या तोऱ्यात निराधारांच्या प्रकरणात काढतो त्रुट्या
सचिन धानकुटे
सेलू : – येथील तहसील कार्यालयात कार्यरत महसूल सहाय्यक “पाटील” हा संजय गांधी निराधार समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी चांगलाच डोक्याला ताप ठरलायं. संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणात हेतुपुरस्सर त्रुट्या काढून खुट्या टाकणारा सदर महसूल सहाय्यक निराधारांना वाऱ्यावर सोडून दलालांच्या दावणीला तर बांधला गेला नाही ना..! अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सदर योजनेच्या कामात सातत्याने ढवळाढवळ करणाऱ्या “पाटील” नामक कर्मचाऱ्याची वर्तणूक पदाधिकाऱ्यांसाठी चांगलीच चर्चेचा विषय ठरली. या बैठकीत पदाधिकारी आणि त्या पाटील नामक कर्मचाऱ्यांत चांगलीच “तू-तू-मै-मै” झाली. सदर कर्मचारी दलालांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रकरणांना तत्काळ निकाली काढतो, परंतु पदाधिकाऱ्यांच्या प्रकरणात मात्र ऐनकेन प्रकारे त्रुट्या काढत असल्याने प्रकरण चांगलेच हातघाईवर आले. यावेळी नायब तहसीलदार मंथनवार यांनी मात्र केवळ मुकदर्शकाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान ज्या प्रकरणात त्रुट्या आहेत, त्या प्रकरणांची फाईल घेऊन येण्याचा आदेश सदर कर्मचाऱ्याला दिला असता, त्याने पुन्हा आपल्या मुजोर प्रवृत्तीचा आणि उचलेगिरीचा परिचय करून देत “मी नाही आणणार” अशी नायब तहसीलदार यांना तंबी दिली. त्यामुळे तो स्वतःला तर तहसीलदार समजत नाही ना..! असाही प्रश्न उपस्थित होतो. सदर मुजोर कर्मचाऱ्यामुळे निराधारांना त्यांच्या हक्कापासून डावललं जात असल्याने अशा कर्मचाऱ्यावर आता तहसीलदार स्वप्निल सोनवणे काय कारवाई करतात, याकडे तालुक्यातील निराधारांचे लक्ष लागले आहे.