रेहकी शेतशिवारात वाघाची दहशत, दोन दिवसांत चार वासरांचा पाडला फडशा, वनविभाग निद्रावस्थेत
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या रेहकी परिसरातील शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत कायम आहे. या परिसरात वाघाने गेल्या दोन दिवसांत चार कालवडींचा फडशा पाडला असतानाही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र तो वाघ नसून कुत्रा असल्याचेचं रडगाणं गात आहेत. विशेष म्हणजे येथील शेतकरी गणेश झाडे यांना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास नदीच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतरही वनविभागाला अद्याप काही घाम फुटला नाही.
रेहकी खुर्द परिसरातील गणेश तुळशीराम झाडे यांच्या दोन कालवडींचा शुक्रवार ता.१ मार्चच्या रात्री वाघाने फडशा पाडल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. त्यानंतर तत्काळ यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देखील देण्यात आली. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी “तो वाघ नसून कुत्रा असेल..!” अशाप्रकारे आपल्या अक्कलेचे तारे तोडलेत. दरम्यान शनिवारी रात्री खुशाल पिन्ने यांच्या एका तर पुंडलिक साठोणे यांच्या एका कालवडीचा त्याच वाघाने फडशा पाडला. एवढेच नाही तर काल रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास शेतकरी गणेश झाडे यांना शेताशेजारील नदीच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. त्यांच्या गोठ्यातील कुटाराच्या ढिगाऱ्यावर देखील बिबट्याच्या पायांच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत आहेत. यासंदर्भात काल पुन्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तेव्हा कुठे अडीच तासानंतर वनविभागाचा फौजफाटा रेहकीत दाखल झाला. या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वाघाची दहशत कायम असून शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. सध्या कापूस वेचणी व हरभरा सवंगणीच्या कामांमुळे मजूरांत देखील भितीचे वातावरण आहे.