शिक्षकदिनी शिक्षकांचे “समान काम समान वेतना”साठी आंदोलन..!
सचिन धानकुटे
वर्धा : – पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकदिनाच्या दिवशीच शिक्षक एकदिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती प्राथमिक पदवीधर विषय शिक्षक वेतनश्रेणी संघर्ष समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर प्राथमिक वेतनश्रेणी लागू करण्यासंबंधाने मागील दहा वर्षापासून पदवीधर विषय शिक्षकांचा शासन स्तरावर लढा सुरू आहे. शासनाने सदर विषयाचे गांभीर्य व मागणी लक्षात घेता आयुक्त(शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला. ह्या अभ्यास गटाने सुद्धा पदवीधर विषय शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी शासनाकडे केली, मात्र शासनस्तरावर यासंदर्भात अद्यापही अनुकूल निर्णय घेत आवश्यक कारवाई करण्यात आली नाही.
राज्यातील १० जिल्हा परिषदांमध्ये सरसकट सर्व पदवीधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी दिली जाते, परंतु इतर जिल्ह्यात मात्र दिनांक १३ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे फक्त ३३% विषय शिक्षकांनाच पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू केली आहे. उर्वरित ६७% विषय शिक्षक वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित आहेत. समान शैक्षणिक अहर्ता, समान काम करीत असतानाही शासनाने समान वेतन लागू न केल्यामुळे राज्यातील ६७% विषय शिक्षकांमध्ये रोष आहे. काही जिल्ह्यांसाठी वेगळा नियम आणि काही जिल्ह्यांसाठी वेगळा हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे जिल्ह्यातील पदवीधर विषय शिक्षकांनी वेतनश्रेणी लागू न केल्यामुळे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी शिक्षकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व विषय शिक्षक एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनास सर्व शिक्षक संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने अभ्यास समितीचा अहवाल स्विकारून दीड ते दोन वर्षाचा कालावधी उलटला, परंतु अद्याप पर्यंत ६७% शिक्षकांना वेतनश्रेणी लागू न केल्यामुळे आमच्यावर आमच्या सन्मानाच्या दिवशी धरणे आंदोलन करण्याची वेळ आली असे पदवीधर विषय शिक्षक संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक नितीन डाबरे, संयोजक निलेश ढोकणे, निमंत्रक मंगेश कोल्हे, राकेश साटोणे, योगेश्वर खेवले, प्रफुल वानखेडे, सुरेश ढोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.