Breaking
ब्रेकिंग

खळबळजनक..! १५ हजार कोटींच्या घोटाळ्यात विदर्भातील अडीच हजार जणांची फसवणूक : आयएक्स ग्लोबल कंपनीचा मास्टरमाईंड भामट्या अखेर गजाआड..! नागपूर पोलिसांनी “विराज पाटील”च्या मुसक्या आवळल्या

2 6 6 6 2 4

सचिन धानकुटे

वर्धा : – पाच ते पंधरा टक्के परताव्याच्या नादी लागल्याने विदर्भातील जवळपास अडीच हजार नागरिकांची फसवणूक झाली. एक दोन नव्हे तर तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या ह्या आर्थिक घोटाळ्यातील मास्टरमाईंड भामट्याला नागपूर पोलिसांनी नुकतेच गजाआड केले. विराज सुहास पाटील रा. दहीसर मुंबई असे “त्या” भामट्याचे नाव आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.

     मिळालेल्या माहितीनुसार, आयएक्स ग्लोबल नामक आंतरराष्ट्रीय कंपनीत गुंतवणूक केल्यास पाच ते पंधरा टक्के परतावा मिळतो, अशा प्रकारे प्रलोभन दिल्यानं विदर्भातील बरेच जण ह्या फसवणुकीच्या गोरखधंद्यात अडकले आहेत. विदर्भासह वर्धा जिल्ह्यात सन २०२१ ते २०२२ दरम्यान या गोरखधंद्याचा उदय झाला. सेलू तालुक्यातील झडशी टाकळीचा सुरज आणि सुरेंद्र सावरकर, वर्ध्यातील डॉक्टर निलेश राऊत आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रिती निलेश राऊत, प्रियंका खन्ना व त्यांच्या बिझनेस पार्टनर आणि एजंट असलेल्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील अनेकांना यात गुंतवणूक करण्यास बाध्य केले. नागरिकांनी देखील या भामट्यांच्या मोहजाळात अडकून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सदर भामट्यांनी आर्गनाईज पद्धतीने काम करत मोठ्या प्रमाणावर प्रत्येक ठिकाणी झूम मिटींगच्या माध्यमातून सेमिनार घेतलेत. आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे सार्वजनिक प्रदर्शन करीत लोकांना या मोहजाळ्यात अडकवून सदर गोरखधंद्यात ओढले. यात प्रामुख्याने वर्ध्यातील डॉक्टर दाम्पत्यासह टाकळीच्या भामट्या सावरकर बंधूंनी गुंतवणूकदारांना हेरले आणि आपल्या जाळ्यात ओढलेत. टिपी ॲप आणि मेटा ट्रेड फाईव्हच्या नावाखाली भरमसाठ अशी गुंतवणूक करण्यात आलीयं. पाच ते पंधरा टक्के व्याजाच्या चक्करमध्ये अनेकजण अगदी सहजरीत्या यात अडकत गेलेत. 

    परंतु २०२३ मध्ये जेव्हा आरबीआयने टिपी ॲप आणि मेटा ट्रेड फाईव्ह अनधिकृत असल्याचं घोषित केलं तेव्हा मात्र गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनचं अचानक सरकली. नेमकं ह्याचवेळी मास्टरमाईंड भामट्या विराज पाटील यास इडीने फेमा कायद्याचे उल्लंघन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. पश्चिम बंगालच्या अलीपूर कारागृहात तो त्यावेळी बंदिस्त होता. दरम्यान सदर भामट्यांनी संपूर्ण भारतात जवळपास १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता मुंबई येथील खाजगी तपास यंत्रणेने वर्तवली होती. सदर आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून विदर्भातील अनेकजण यात बळी पडले आहेत.

     नागपूर पोलिसांनी सदर घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार विराज सुहास पाटील ह्याला नुकतेच गजाआड केले असून न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विदर्भातील अन्य ठगबाज ज्यात वर्ध्यातील डॉक्टर निलेश राऊत व टाकळीच्या सावरकर नामक भामट्या बंधूंना आधीच अटक करण्यात आलीयं. त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात जामिनासाठी याचीका दाखल केली असून त्यावर येत्या १८ तारखेला सुनावणी होणार आहे. या भामट्यांना जामीन मिळू नये, याकरिता गुंतवणूकदारांसह नागपूर पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सध्या न्यायालयाच्या आदेशाकडे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. पोलिसांनी सदर भामट्यांची बँक खाती गोठवली असून संपत्ती देखील जप्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास नागपूर पोलीस करीत आहे.

4.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे