सेलूच्या शिरपेचात मानाचा तुरा.., प्रज्वल भिंगारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मेरीट यादीत..! पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड
सचिन धानकुटे
सेलू : – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मेरीटच्या यादीत स्थान मिळवत येथील प्रज्वल भाऊराव भिंगारे याने सेलूच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रज्वल पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा चारही टप्प्यात त्याने घवघवीत यश संपादित केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सेलू येथील प्रज्वल भाऊराव भिंगारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रज्वलने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे चारही टप्पे यशस्वीरीत्या पार करीत तो मेरीट यादीत झळकला. प्रज्वलचे वडील सेवानिवृत्त शिक्षक तर आई गृहिणी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण स्थानिक दिपचंद चौधरी विद्यालयात तर बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयात झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड येथून त्याने पदवी संपादीत केली. एक निष्ठावान पोलीस अधिकारी बनून समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रज्वलचा मानस आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांसह भाऊ उज्वल यांना देत असल्याचं बोलताना सांगितले. त्याच्या या अभुतपुर्व यशाबद्दल सध्या पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गेल्यावेळी तालुक्यातीलच झडशी येथील दैनिक देशोन्नतीचे उपसंपादक राजू कोहळे यांच्या जयंत नामक मुलाने घवघवीत यश संपादित केले होते. त्याची देखील पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आली असून तो सध्या नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेत आहे. आता प्रज्वलने देखील ह्याच परिक्षेत घवघवीत यश संपादित केल्याने सेलू तालुक्यासाठी ही अभिनंदनीय आणि गौरवास्पद बाब ठरली आहे.