सेलूच्या रोजगार मेळाव्याला बेरोजगारांचा उत्सफूर्त प्रतिसाद, पुण्याच्या २२ नामांकित कंपन्यामध्ये ६१४ जणांची निवड
साहसिक जनशक्ती संघटनेचा स्तुत्य उपक्रम ; रवींद्र कोटंबकार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला मिळाले काम
सचिन धानकुटे
सेलू : – जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळावे, याकरिता साहसिक जनशक्ती संघटना तसेच मित्र परिवाराच्या वतीने आज सेलू येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात पुणे येथील नामांकित २२ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी जिल्ह्यातील ९१० बेरोजगार युवक आणि युवतींनी नोंद करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखत दिली. यामध्ये ६१४ युवक आणि युवतींची निवड करण्यात आली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक साहसिक व साहसिक न्युज-२४ चे संपादक रवींद्र कोटंबकार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील ७ हजार बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला होता. याकरिता साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या सहकार्याने आज सोमवारी सेलूच्या यशवंत महाविद्यालय तथा यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्याच्या नामांकित अशा २२ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये टाटा ऑटोकॉम्प प्रा. लिमिटेड, युएनओ मिंडा(सूपा) प्रा. लिमिटेड, ब्रिटानीया फुडस् प्रा. लिमिटेड, एर्लिंग किंगर, ग्रोअप टेक्नॉलॉजी, एसपीएम प्रा. लिमिटेड, एक्साईड बॅटरी प्रा. लिमिटेड, सूपोद प्रा. लिमिटेड, ग्रुपो अँटोलीन प्रा. लिमिटेड, फ्लॅश ईलेक्ट्रानिक्स प्रा. लिमिटेड, निब प्रा. लिमिटेड, गेडीया प्रा. लिमिटेड, ऑप्टिव कंपोनेंट्स प्रा. लिमिटेड, ओमिनी ऍक्टिव्ह प्रा. लिमिटेड, श्रीनिवास मॅनरिसोर्स प्रा. लिमिटेड, सहारा सिक्युरिटी फोर्स, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-आँप सोसायटी आणि अग्निहोत्री ग्रुप, वर्धा तसेच जय महाकाली शिक्षण संस्थेचा देखील समावेश होता.
या भव्य अशा रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ९१० बेरोजगार युवक आणि युवतींनी आपली नोंदणी करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखत दिली. यातील ६१४ जणांची निवड करण्यात आली असून त्यांना यावेळी नियुक्ती पत्र देखील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनाला तहसीलदार स्वपनिल सोनवणे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप काळे, अविनाश देशमुख, भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक पवन तिजारे, सिंदी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती दिलीप गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक तथा कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार, धानोलीच्या सरपंच जयश्री शंखदरबार, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, पुणे येथील श्रीनिवास जॉब सेंटरचे सिईओ गोविंद वाघमारे व परशुराम कुसाळकर, मोहीचे माजी सरपंच अमर पाटील धोटे, वाहितपूरचे माजी सरपंच सुभाष डायगव्हाणे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कोटंबकार यांनी, संचालन किरण पट्टेवार यांनी तर आभार संजय चौधरी सरांनी मानले.
रोजगार मेळाव्याच्या यशस्वितेसाठी साहसिक जनशक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष सागर राऊत, प्रकाश बडेरे, बाळा टालाटुले, प्रकाश कोटंबकार, अशोक कांबळे, गणेश खोपडे सह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.