खर्चाचा हिशोब सादर न करणारे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे 32 सदस्य अपात्र : जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : पाच वर्ष लढविता येणार नाही निवडणूक
किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा खर्च उमेदवारांना 30 दिवसांच्या आत संबंधित तहसिलदारांकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु मुदतीत खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील निवडणूक लढविलेल्या 32 उमेदवारांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य म्हणून राहण्यास व पुढील पाच वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचा आदेश आज निर्गमित केला.
जिल्ह्यात 16 ऑक्टोंबर रोजी काही ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीचा निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक होते. परंतु उमेदवारांनी हिशोब सादर न केल्याने त्यांना नोटीस देऊन 15 दिवसाच्या आत हिशोब सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वर्धा तालुक्यातील बोरगाव (ना) येथील 6, सालोड (हि) येथील 2 अशा 8 सदस्यांनीच आपले लेखी म्हणणे सादर केले होते.
नोटीसनंतरही आपले खर्चाचे हिशोब अनेक उमेदवारांनी सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूक आयोगाचे आदेश व मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील निवडणूक लढविलेल्या 32 उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष हे उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाही.
अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये वर्धा तालुक्यातील सालोड (ही) ग्राम पंचायतीमधील 16 उमेदवारांचा समावेश आहे. याच तालुक्यातील बोरगाव (ना) या ग्रामपंचायतीमधील 6 उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. आर्वी तालुक्यातील मांडला ग्रामपंचायतीतील 2, पिपरी (भुतडा) ग्रामपंचायती मधील 1, मिर्झापूर नेरी ग्रामपंचायतीमधील 3, अहिरवाडा ग्रामपंचायत 1, सर्कसपूर ग्रामपंचायत 2 तर जाम (पू) ग्रामपंचयतीमधील 1 उमेदवाराचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने कळविले आहे.
मसाळा ग्रामपंचायतीच्या 12 सदस्यांवरही अपात्रतेची कारवाही व्हावी, याकरिता याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर तपासणी सुद्धा झाली, चौकशीत मसाळा ग्रामपंचायतीचा सर्वच बनावटपणा उघडकीस झाला आहे. पण अपात्रतेचे शिक्कामोर्तब झाले नाही, परंतु लवकरच यावर निर्णय दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.