वर्ध्यात पत्रकार भवनाची उभारणी व्हावी : व्हॉइस ऑफ मीडियाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
वर्धा : वर्धा शहरात जिल्ह्यातील पहिले पत्रकार भवन उभारले जावे यासाठी व्हाईस ऑफ मीडिया गेल्या काही वर्षापासून सतत पाठपुरावा करीत आहे. वर्ध्यात पत्रकार भवनाची उभारणी व्हावी यासाठी मंगळवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन स्थळी वनमंत्री तसेच वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. लवकरच पत्रकार भवन वर्ध्यात उभारले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहे.
वर्धा शहराला तसेच जिल्ह्याला आचार्य विनोबा भावे , महात्मा गांधी यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांच्या पत्रकारितेचा वारसा आहे. महाराष्ट्र राज्यातील असंख्य जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन उभारले गेले आहे. पण अद्याप वर्धा जिल्ह्यात पत्रकार भवन नाही. गेल्या काही वर्षात पत्रकार भवन उभारणीसाठी पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वी नियोजन समितीच्या बैठकीत देखील पत्रकार भवनाबाबत चर्चा झाली आहे. याबाबत इतिवृत्तात देखील नोंद करण्यात आली होती. जागा शोधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला पण प्रत्यक्षात पत्रकार भवन उभारण्यात आले नाही. वर्धा शहरात पत्रकार भवन उभारणी व्हावी यासाठी मंगळवारी नागपूर येथील अधिवेशन स्थळी विधानभवन परिसरात वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात यावर चर्चा करण्यात आली. पत्रकार भवनाबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर कारंजेकर, विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, जिल्हा सचिव एकनाथ चौधरी, सेलू तालुक उपाध्यक्ष सचिन धानकुटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.