बैल चोरणारी सहा जणांची टोळी गजाआड ; १३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पशुधन चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला गजाआड करीत जवळपास १३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जिल्ह्यातील सिंदी(रेल्वे), सेलू, पुलगांव, कारंजा आणि सावंगी(मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलं चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येवून यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात जनावरे चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. समृद्धी महामार्गा लगतच्या शेतातील गोठ्यात बांधून असणाऱ्या जनावरांवर एकप्रकारे चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी सदर चोरीच्या घटनांचा आढावा घेत याकरिता महामार्गावर पोलिसांची गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला. याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांनी आपल्या पथकासह तपास सुरू केला. दरम्यान जालना ते नागपूर पर्यंतच्या सगळ्या टोल नाक्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि वाहनांची कसून चौकशी करण्यात आली. यातूनच मिळालेल्या माहितीनुसार नागपूर भिवापूर येथून अजय धनराज चौधरी(वय२७), अतुल धनराज चौधरी(वय२९), गुंडेराव आनंदराव दडमल(वय२५), कुंदन गब्बर गोयल(वय२२), सुनिल बारसू सावसाखळे(वय२२), स्वपनिल शंकर आत्राम(वय२२) अशा सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना पोलिसी हिसका दाखवताच चोऱ्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून जनावरे चोरीसाठी वापरण्यात आलेले एम एच ४० बिएल ०७२२ आणि एम एच ४० सिडी २३३५ क्रमांकाचे दोन बोलेरो पिकअप वाहन, पाच मोबाईल आणि बैल विक्रीचे ७० हजार रुपये असा एकूण १३ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यातील सहाही आरोपी शनिवारपर्यंत सिंदी(रेल्वे) पोलिसांच्या ताब्यात होते. यापैकी तीघांची जामीनावर सुटका करण्यात आली असून तीघांना सेलू पोलिसांनी आज शनिवारी सायंकाळी न्यायालय परिसरातूनच ताब्यात घेतले. त्या तीन आरोपींकडून सेलू पोलीस किती गुन्हे उघडकीस आणतात याकडे आता लक्ष लागले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, सिंदीच्या ठाणेदार सोनुने, उपनिरीक्षक सोनपितरे, शिवकुमार परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, विकास अवचट, संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, राजेश जयसिंगपूरे, सायबर शाखेचे दिनेश बोथकर आदि कर्मचाऱ्यांनी केली.