Breaking
ब्रेकिंग

शेतकरी महिला निधीच्या भरोशावर वंडरलँड वॉटरपार्क “आबाद” अन् खातेदार “बरबाद” : पैशासाठी खातेदारांच्या बँकेच्या शाखेत येरझारा, वातानुकूलित कक्षात व्यवस्थापक “चौकोने” घामाघूम

2 0 3 6 7 2

सचिन धानकुटे

सेलू : – शेतकरी महिला निधी बँकेच्या भरोशावर आंजी नजिकचे वंडरलँड वॉटरपार्क चांगलेच आबाद झाले. परंतु बँकेच्या खातेदारांसह अभिकर्त्यावर मात्र बरबाद होण्याची वेळ आली. खातेदार आपल्या हक्काच्या पैशासाठी एकीकडे बँकांच्या शाखेत येरझारा मारत आहेत, तर दुसरीकडे अध्यक्ष महोदय दिल्लीच्या गल्लीची हवा खात असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगितल्या जाते. एकंदरीतच यामुळे खातेदारांत संतापाची लाट निर्माण झाली असून “तारीख पे तारीख”चा कधी विस्फोट होईल, याचा सध्या तरी अंदाज बांधता येणे कठीण आहे.

       शेतकरी महिला निधी बँक जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपाला आली. बँकेच्या शाखांचा पसारा वाढताच अध्यक्ष शरद कांबळे यांच्या डोक्यात वंडरलँड वॉटरपार्कचे भूत शिरले. याकरिता आंजी लगतच्या दुर्गम भागात एका माळरानावर आदिवासी शेतकऱ्याची जमीन लीजवर घेण्यात आली. त्याठिकाणी हायप्रोफाईल वंडरलँड वॉटरपार्कची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली. याकरिता शेतकरी महिला निधी बँकेच्या विविध शाखेतील पैसा पाण्यासारखा ओतण्याचे धाडस करण्यात आले. परंतु दुर्गम भागात असलेल्या वंडरलँड वॉटरपार्कला ग्राहकच मिळत नसल्याने शरदची संकल्पना सपशेल अपयशी ठरली.

   दरम्यान जिल्ह्यात नुकताच एक भूसंपादन घोटाळा उघडकीस आला असून त्या घोटाळ्यातील “मलिंदा” शेतकरी महिला निधीच्या बेनामी खात्यात असल्याचे तपासी अधिकाऱ्यांना आढळले. त्यामुळे साहजिकच बँकेचा कारभार चौकशीच्या फेऱ्यात अडकला. ही बाब उजेडात येताच खातेदारांच्या पैशासाठी बँकेच्या शाखेत रांगा लागल्यात. परंतु बिनडोक व्यवस्थापनाने बँकेतील सारा पैसा वंडरलँडच्या जडणघडणीत ओतल्याने अन् त्याचवेळी भूसंपादन घोटाळा उघडकीस येवून बँक अडचणीत आल्याने खातेदारांच्या पैशाचा घोळात-घोळ अचानक चव्हाट्यावर आला. एकीकडे खातेदार पैशासाठी वणवण फीरत आहेत, तर दुसरीकडे अध्यक्ष महोदय दिल्लीच्या गल्लीची हवा खात आहे. त्यामुळे खातेदारांत चांगलीच संतापाची लाट उसळली असून त्याचा कधी आणि केव्हा विस्फोट होईल याचा काही नेम नाही.

    सेलू तालुक्यातील एका एफडी धारकास काल सोमवारी अध्यक्ष शरद कांबळे यांनी फोन करून धनादेश घेण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे ते वर्ध्याच्या शाखेत पोहचले देखील, परंतु अध्यक्ष महोदय ऐनवेळी लापता झाले. यावेळी अध्यक्ष महाशय सहायतामध्ये तर तोंड लपवून बसले नसतील, म्हणून त्या खातेदाराने सहायता बँक देखील गाठली. परंतु तेथेही दररोज दर्शन देणारे अध्यक्ष नेमके कालचं आले नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. शेवटी त्या खातेदाराने सेलूच्या शाखेत व्यवस्थापक मनोज चौकोने यांना गाठले. त्यांनी देखील यावेळी तुमचा सगळा पैसा बँकेच्या प्रणालीत असून अध्यक्ष “शरद”ला गाठण्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष महोदयांची भेट होणे तर दुर्लभच परंतु खातेदारांचा साधा फोनही उचलत नसल्याचे वास्तव समोर आले. दरम्यान त्या खातेदाराने अध्यक्षांच्या गळ्यातील ताईत असलेल्या संस्थाचालक “किनकर”ला संपर्क साधला असता अध्यक्ष महाशय दिल्लीच्या गल्लीची हवा खाण्यासाठी गेल्याचे सांगितले.

  

*व्यवस्थापक मनोज चौकोने घामाघूम*

  सेलू येथील शाखेचे व्यवस्थापक मनोज चौकोने यांच्याकडे पाहूनच तालुक्यातील अनेकांनी बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. परंतु आता मात्र ते अध्यक्ष महोदयांकडे बोट दाखवतात. यावेळी आपल्या हक्काच्या पैशासाठी शाखेत आलेल्या खातेदारांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना व्यवस्थापक “चौकोने” देखील वातानुकूलित कक्षात चांगलेच घामाघूम झाले होते. म्हशी पाळणाऱ्याकडे शहरात एक कोटींचा बंगला, काही महिन्यांपूर्वीच अध्यक्षांनी परत घेतलेली कार, सेलूत दोन दोन प्लाट आणखी बरेच काही यानिमित्ताने संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.

 

*अध्यक्ष मालामाल अन् खातेदार कंगाल*

 शेतकरी महिला निधी बँकेच्या कारभारामुळे अध्यक्षांच्या संपत्तीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. ३६ एकर शेती एका ठिकाणी आणि ३६ एकर शेती दुसऱ्या ठिकाणी, यासोबतच १२ एकर शेती अशी एकूण ८४ एकर शेती खातेदारांच्या पैशाच्या जोरावर तर उभी केली नाही ना..! अशी चर्चा सध्या खातेदारांत सुरू आहे. वंडरलँड वॉटरपार्कच्या उभारणीत शेतकरी महिला निधीच्या प्रत्येक शाखेतून दर आठवड्याला आठ ते दहा रुपये वळते व्हायचे,असे दस्तुरखुद्द व्यवस्थापकच सांगतात. त्यामुळे शेतकरी महिला निधीच्या जीवावर अध्यक्ष जरी मालामाल झाले असले तरी खातेदार मात्र कंगाल झालेत हेही तितकेच खरे..!

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 6 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे