सेलूच्या “बारभाई” गणेश मंडळाला राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा..! यंदाचं रौप्यमहोत्सवी वर्ष, लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती प्रतिष्ठापना
सचिन धानकुटे
सेलू : – स्वातंत्र्यपूर्व काळात इसवी सन १९०० मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वतः प्रतिष्ठापना केलेल्या येथील बारभाई गणेश मंडळाला राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा लाभला आहे. ह्या मंडळाचं यंदाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पाचव्या पिढीतील मंडळाचे शिलेदार १२५ वर्षांपासूनची परंपरा विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करतात. यंदा दफ्तरी परिवाराच्या वतीने याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना व विधीवत पूजाअर्चा केल्या गेली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनमानसात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली होती. त्यावेळी इसवी सन १९०० मध्ये लोकमान्य टिळक स्वतः सेलू नगरीत आले. त्यांनी स्वातंत्र्यासाठीची तळमळ असलेल्या नागरिकांची एक बैठक घेतली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाची भूमिका विषद करण्यात आली. त्याकाळातील उपस्थितांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तत्काळ होकार दर्शविला आणि तेव्हापासून ते आजतागायत ही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा अविरतपणे येथे सुरू आहे. त्यावेळी या बैठकीला आवर्जून बारा सदस्यचं उपस्थित होते. त्यामुळे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे “बारभाई गणेश मंडळ” असं नामकरण देखील लोकमान्य टिळक यांनी स्वतः केले. एवढेच नाही तर त्यांनी त्यावेळी येथील श्रीगणेशाची प्रतिष्ठापना देखील केली. बारभाई गणेश मंडळाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. याप्रसंगी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अगदी साधेपणाने करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक देखील मोठ्या उत्साहात हिरीरीने या सोहळ्यात सहभागी होत असल्याचे याप्रसंगी आयोजकांनी आवर्जून सांगितले. दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
याठिकाणी मूर्ती देणाऱ्यास तब्बल बारा वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. या मंडळात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी आहेत. प्रत्येकाची इच्छा आणि अपार श्रद्धा असल्याने मूर्ती देण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे येथे मूर्ती देणाऱ्यास आधी नोंदणी करावी लागते, त्याप्रमाणे पुढील बारा वर्षांची नोंदणी आधीच झाली आहे. येथे मूर्ती देणाऱ्यास तब्बल बारा वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. यंदा ७ ते १८ याकाळात हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १८ तारखेला भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ तारखेला पवनार येथील धाम नदीच्या पात्रात विसर्जन केले जाते. येथील १२५ वर्षांपासूनच्या परंपरेत गेल्या ७० वर्षांपासून श्रीगणेशाची मूर्ती तयार करण्याचे काम स्थानिक मूर्तीकार पुरुषोत्तम वालदे करीत आहेत.
“बारभाई”ला राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा..!
येथील बारभाई गणेश मंडळात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. १२५ वर्षांपासून सदर मंडळ सर्वधर्मसमभावाचे प्रतिक आहे. या मंडळाला राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा लाभला आहे. रौप्यमहोत्सवी वर्षाला यंदा स्थानिक दफ्तरी परिवाराला श्रीगणेशाची मूर्ती देण्याचा बहुमान मिळाला. मूर्ती देणाऱ्यास येथील परंपरेप्रमाणे पहिल्या दिवशी पूजेचा मान देखील दिला जातो.