बोर नदीपात्रात इसमाची आत्महत्या
सचिन धानकुटे
सेलू : – शहरातील एका इसमाने बोर नदीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. अफसर पठाण (वय४०) रा. सेलू असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अफसर पठाण शहरात तसेच खेडोपाडी भांडे विक्रीचा व्यवसाय करायचे. खेड्यापाड्यावर जाऊन भांड्याची विक्री केल्यानंतर आज ते दुपारच्या सुमारास घरी परतले. यावेळी त्यांनी आपले व्यावसायिक साहित्य घरीच ठेवले आणि ते आपल्या एमएच ३२ ई २४९६ क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडलेत. दरम्यान त्यांची दुचाकी बोर नदीच्या पुलावर उभी असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसले. यासंदर्भातील वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच बोर नदीच्या पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी दाखल झालेत. शेवटी पोलिसांनी कोळ्यांच्या मदतीने नदीच्या पाण्यात शोध घेतला असता त्यांना मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह हा अफसर पठाण ह्यांचा असल्याचे त्यांच्या नातलगांनी ओळखले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवीला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पोलीस अधिक तपास करीत आहे. मृतकाच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.