आश्चर्यकारक..! नेमकं जलाशय आहे की तहसील कार्यालय..? नागरिकांत संभ्रमावस्था
सचिन धानकुटे
सेलू : – येथील तहसील कार्यालयाच्या समोर जलाशय सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नेमकं तहसील कार्यालय आहे की जलाशय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच येथील तहसील कार्यालय आपल्या नवनिर्माणाधीन इमारतीत दाखल झाले आहे. याठिकाणी कामकाजाच्या निमित्ताने दिवसभर तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, पुरवठा विभाग, यासह नागरिकांची सतत वर्दळ असते. दुय्यम निबंधक कार्यालय आणि भुमिअभीलेख कार्यालय देखील येथेच आहे. परंतु या सगळ्याच कार्यालयाच्या समोरील प्रवेशद्वारावर सध्या नैसर्गिक जलाशय निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकालाच या जलाशयातून कार्यालयापर्यंत वाट काढावी लागते. याठिकाणी बऱ्याचदा दुचाकीस्वार घसरुन पसरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अवैधरित्या वाहून जाणाऱ्या मुरुमाच्या गाड्या पकडतात, त्यांच्याकडून मालसूताई देखील करतात. परंतु एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला त्याठिकाणी मुरुम टाकण्याचे सौजन्य अद्याप तरी दाखवता आले नाही. समजा असे शक्य होत नसेल तर निदान त्या जलाशयात मत्स्यव्यवसाय सुरू करुन येणाऱ्या पैशातून तरी त्याठिकाणी मुरुम टाकण्याचे सौजन्य दाखवावे, अशी संतप्त भावना याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.