उद्या होणार गणरायाचे आगमन : सावंगी मेघे येथे दहा दिवसीय सांस्कृतिक महोत्सव : आरोग्य शिबिरे व ज्ञानविज्ञान प्रदर्शनीचाही शुभारंभ

वर्धा – सावंगी येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव आणि श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टचा गणेशोत्सवाचा शुभारंभ मंगळवार, दि. १९ रोजी होतो आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक रोषणाई, सप्तरंगी कारंजे, देखणी सजावट, ज्ञानविज्ञान जनजागर प्रदर्शनी, विविध आरोग्य शिबिरे आदींचे वैविध्यपूर्ण आयोजन नागरिकांकरिता करण्यात आले आहे.
सावंगीच्या शैक्षणिक परिसरात मंगळवारी सकाळी १० वाजता कुलपती दत्ता मेघे व शालिनीताई मेघे यांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची स्थापना होणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरोग्यम् धनसंपदा या ज्ञानविज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. यावर्षी शनिवार, दि. २३ ला सायंकाळी ७ वाजता स्वरवैदर्भी विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा तसेच रविवार, दि. २४ रोजी जलसा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आहे. याशिवाय, विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी वादविवाद स्पर्धा, छायाचित्रण, बॉडी आर्ट पेंटिंग, ट्रेझर हंट, प्रश्नमंजुषा, पाककृती, ई स्पोर्ट्स यासह विविध क्रीडा आणि कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकालीन सत्रात विविध प्रांतातील लोककला, संगीत रजनी, गुरुकुल, नाटिका, नृत्य व अन्य कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांच्या काळात नागरिकांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरद्वारे सुमारे शंभराहून अधिक विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी जनजागृतीपर कार्यक्रमांचा तसेच आरोग्यदायी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डाॅ. ललितकुमार वाघमारे, प्रशासकीय महासंचालक डाॅ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, सांस्कृतिक संयोजक डाॅ. आशिष अंजनकर व आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.