मोबाईलसह बळजबरीने पैसे हिसकणारा बोरखेडीचा “आकाश” गजाआड

सचिन धानकुटे
वर्धा : – दुचाकी चालकास रस्त्यात अडवून त्याच्याकडील मोबाईलसह रोख रक्कम लंपास करणाऱ्याला हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथटाने अवघ्या दोन तासात गजाआड केले. आकाश पुरुषोत्तम चव्हाण(वय२६) रा. बोरखेडी(कला), पोस्ट झडशी, ता. सेलू, जिल्हा वर्धा असे त्या चोरट्याचे नाव आहे.
हिंगणघाटच्या माता मंदिर वार्डातील ओंकार प्रभाकर वाकेकर हे नांदगाव येथून आपल्या दुचाकीने कँटरींगचे पेमेंट घेऊन शहराकडे येत होते. दरम्यान काल रविवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास त्यांना शहरातील आंबेडकर चौकात पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमोतील एकाने हात दाखवून थांबण्यास सांगितले. सदर वाहनातील इसमाने ते थांबले असता हातात रॉड घेऊन धाकदपट करीत त्यांच्याकडील मोबाईलसह खिशातील एक हजार रुपये घेऊन जाम रस्त्याने आपल्या वाहनासह पळ काढला. याप्रकरणी ओंकार वाकेकर यांनी लागलीच हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फीरवलीत आणि अवघ्या दोन तासात “त्या” चोरट्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील एम एच ४० एआर २२२५ क्रमांकाची सुमो गोल्ड, चोरुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल व पाचशेच्या दोन नोटा असा एकूण ७ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या निर्देशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, सागर सांगोलेसह सायबर सेल वर्धाचे दिनेश बोथकर, अक्षय राऊत आदि कर्मचाऱ्यांनी केली.