आमगांव (खडकी) ग्रामपंचायतच्या आत मनोरुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न ; हातासह शरीरावर ब्लेडने केले वार

https://youtu.be/2O6tvaEn28k
सचिन धानकुटे
सेलू : – तालुक्यातील आमगांव(खडकी) ग्रामपंचायत कार्यालयाच्या आत प्रवेश करीत एका मनोरुग्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मनोरुग्णाने स्वतःच्या हातावर व शरीरावर ब्लेडने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. अनुप भाऊराव घरडे (वय३८) रा. विश्वकर्मा नगर, नागपूर असे “त्या” मनोरुग्णाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी मनोरुग्णाला उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असून मनोरुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.
नागपूरच्या विश्वकर्मा नगरातील मनोरुग्ण अनुप घरडे हा आज पहाटे दोन वाजताच्या दरम्यान दुचाकीने आमगांव(खडकी) येथे आला. त्याने येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान त्याने ब्लेडच्या साह्याने स्वतःच्या हातावर व शरीरावर सपासप वार करीत स्वतःला जखमी केले आणि रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडला. दरम्यान सकाळी सात वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत शिपाई संतोष सावरकर हे नळाचा व्हॉल्व सोडण्यासाठी गेले असता त्यांना अनुप हा रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती सरपंच राजेश लोणकर यांना दिली. सरपंच लोणकर यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने खडकी येथील रुग्णवाहिकेने मनोरुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करीत त्याचा बयाण नोंदवून घेतला.
जखमी मनोरुग्णाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र व आत्महत्या करीत असल्याचे लेखी पत्र आढळून आले आहे. सरपंच लोणकर यांनी मनोरुग्णाच्या नागपूर येथील भावाशी संपर्क साधला असता अनुप हा मानसिक रुग्ण असून, तो नेहमी मानसिक तणावात राहतो. त्याचा खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याचेही सांगितले. सिंदी पोलिसांनी सदर घटनेची नोंद घेतली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.