बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्या केल्या फस्त, शेतकऱ्यांत भितीचे वातावरण : मौजा ईचोरा शिवारातील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – चार दिवसात पाच जनावरांना आपले भक्ष्य करणारा बिबट्या परत एकदा वडगांव खुर्द आणि रेहकी शिवारात शिरला. यावेळी बिबट्याने गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित करीत त्यातील दोन बकऱ्या फस्त केल्यात. ही घटना आज रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मौजा ईचोरा शेतशिवारात घडली. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेहकी लगतच्या वडगांव खुर्द शिवारातील मौजा ईचोरा परिसरात कुशाबराव मुडे यांची शेती जगदीश पांडे यांनी ठेक्याने केली आहे. या शेतातील गोठ्यात जगदीश पांडे यांच्या मालकीच्या आठ बकऱ्या बांधून होत्या. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केला. ही बाब लक्षात येताच रखवालदार आत्राम यांनी सदर बिबट्याला हुसकावून लावले, परंतु तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. सदर घटनेनंतर यासंदर्भात झडशी सहवन क्षेत्राचे टाक तसेच हिंगणी वनविभागाचे अक्षय आगासे यांना माहिती देण्यात आली. परंतु अर्ध्या तासात पोहचणारे वनविभागाचे अधिकारी एक तासानंतरही घटनास्थळी पोहचले नाहीत. वनविभागाचा यापैकी एकही अधिकारी मुख्यालयी राहत नसून ते बसल्या जागेवरुनच उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करतात. याआधी देखील बिबट्याने हल्ला केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. परंतु तेव्हा तो वाघ नाही तर कुत्रा वगैरे असेल अशाप्रकारे आपली अक्कल पाजळण्यातच धन्यता मानली. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांविषयी परिसरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.