निरुपयोगी विहिरीच्या काठावरील घर होणार जमिनदोस्त..? प्रशासनाचा कानाडोळा..!

सचिन धानकुटे
सेलू : – भर पावसाळ्यात ढासळणाऱ्या निरुपयोगी विहिरीमुळे अख्खे घरचं जमिनदोस्त होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे संभाव्य धोका गडद झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल त्या कुटुंबियाकडून सध्या उपस्थित केला जात आहे.
रेहकी येथील देविदास भुते यांचे गावाच्या एका टोकाला घर आहे. याठिकाणी ते आपल्या सहा जणांच्या संपूर्ण कुंटुबासह वास्तव्य करतात. घराच्या शेजारीच असलेल्या शेतात एक निरुपयोगी विहीर आहे. दोन वर्षापूर्वीच्या पावसाळ्यात सदर विहिर पूर्णतः खचली, तेव्हा पासून त्या नादुरुस्त विहिरीचा कडा सातत्याने ढासळत असल्याने तेथील घराला संभाव्य धोका निर्माण झाला आहे. सदर घर विहिरीत जमिनदोस्त होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल रात्रीच्या पावसात परत त्या विहिरीचा काही भाग कोसळून जमिनीत साठवला. त्यामुळे सदर घर जमिनदोस्त होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना अवगत करण्यात आले आहे. तत्कालीन तहसीलदार यांनी देखील संभाव्य धोका असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा सूचना संबंधित विहीर मालकास देण्यात आली नाही. संबधितास वेळीच जर तो निरुपयोगी विहिरीचा खड्डा बुजविण्या संदर्भात निर्देश दिले नाही, तर मोठी दुर्घटना घडणार यात तिळमात्र शंका नाही. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी भुते कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.