वर्धा जिल्ह्यात हेल्मेट अनिवार्य अन्यथा कारवाईचा बडगा
सचिन धानकुटे
वर्धा : – येत्या एक मे पासून जिल्ह्यात मोटारसायकल चालवितांना हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. याकरिता पोलीस विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविली जाणार असून हेल्मेट न घालता वाहन चालविणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांमध्ये मोटारसायकलचे एकूण १०३९ अपघात झाले आहेत. यात वाहन चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागल्याने जवळपास ४३१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोटारसायकल चालवितांना हेल्मेट घालणे अनिवार्य असून याकरिता पोलीस विभागाच्या वतीने येत्या एक मे पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान विना हेल्मेट वाहन चालवताना आढळल्यास वाहनधारकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून वाहन धारकांनी हेल्मेट घालूनच मोटारसायकल चालवावी असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.