केळझरचा प्रसिद्ध सिद्धीविनायक विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक.. गणेशोत्सव काळात भाविकांची मांदियाळी
सचिन धानकुटे
सेलू : – केळझर येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून गणेशोत्सव काळात येथे गणेश भक्तांची मांदियाळी पहायला मिळते. केळझर विदर्भात सर्वदूर सुपरिचित आहे. नागपूरवरून ५२ किलोमीटर तर वर्ध्याहून २६ किलोमीटर अंतरावर टेकडीच्या कुशीत गणेशाचे मंदिर वसले आहे. वर्धा-नागपूर मुख्य मार्गापासून अंदाजे एक फर्लांग अंतरावर उत्तरेकडे उंच टेकडीवर गणेशाचे प्राचीन मंदिर आहे.
वशिष्ठ पुराणाप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व
केळझरचे नाव एकचक्रनगर असल्याचा उल्लेख वशिष्ठ पुराणासह महाभारतात देखील आढळतो. वशिष्ठ पुराणाप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे वास्तव्य असल्याची नोंद असून वशिष्ठ ऋषींनी स्वतःच्या भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. ह्याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव ‘वरदविनायक’ असून वर्धा नदीचे ‘वरदा’ असे नाव आहे. हा काळ श्रीरामजन्माच्या पूर्वीचा असून रामजन्मानंतर श्री वशिष्ठ ऋषींनी येथील वास्तव्य सोडले. येथे कुंतीपुत्र पांडव एकचक्रनगरात वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाला मारल्याचा उल्लेख महाभारतामध्ये आढळते. ते ठिकाण वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर गावाच्या आग्नेय बाजूला बौद्ध विहारासमोर बकासूर, तोंड्या राक्षसाचे मैदान म्हणून प्रचलित आहे. ह्याच टेकडीवर श्री गणपतीचे मंदिर आहे. टेकडी निसर्गरम्य असून वाकाटकाच्या काळापासून एका भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. त्या किल्ल्याला पाच बुरुज होते. तीन माती-दगडांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या आणि दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी सुंदर व भव्य अशी विहीर असून त्याला ‘गणेशकुंड’ या नावाने ओळखले जाते. असंख्य भाविक त्याचा तीर्थ म्हणूनही वापर करतात. वाकाटकानंतर प्रवर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. भोसलेराजे कोल्हापूरवरून नागपूरला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचा केळझरला मुक्काम झाल्याची नोंद आहे. केळझर येथील वरदविनायक श्री गणपतीच्या मूर्तीची उंची ४ फूट ६ इंच असून व्यास १४ फूट आहे. सन १९९३ मध्ये या मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात झाली. १९९४ मध्ये महाशिवरात्रीच्या अगोदर खोदकामात येथे शिवलिंग मिळाले. याविषयी शिवलीला अमृताच्या अखेरच्या अध्यायात एकचक्रनगरात ज्योर्तिलिंग असल्याची नोंद आहे. याच गावात जैन पंथाचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू स्वामींची सुरेख मूर्ती मिळाली. ती आठव्या शतकातील असावी, अशी आख्यायिका आहे.
नवसाला पावणारा गणपती
विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात आणि नवस बोलतात. नवस पूर्ण झाला की भाविक मोठ्या आनंदाने वरद विनायकाजवळ नवस पूर्ण करतात. विदर्भातील अष्टविनायकापैकी नवसाला पावणारा वरदविनायक म्हणुन या ठिकाणी भाविकांची श्रध्दा आहे.
गणेशोत्सवात दहा दिवस येथील मंदिरात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दररोज पहाटे राममुराद मिश्रा श्रींची आंघोळ घालुन पुजाअर्चा करतात तर अभिषेक मंगेश शंकर धर्मुळ यांच्या हस्ते होणार आहे. येथे अनंत चतुर्दशीला होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष माधव ईरुटकर, सचिव महादेव कापसेसह सदस्यांनी केले आहे.*